Join us

राजकीय आणि आर्थिक स्वच्छतेसाठी नोटाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 11:46 PM

राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील स्वच्छतेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असून, उत्तर प्रदेशातील निवडणुकीशी त्याचा संबंध जोडण्यात येऊ नये

लखनौ : राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील स्वच्छतेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असून, उत्तर प्रदेशातील निवडणुकीशी त्याचा संबंध जोडण्यात येऊ नये, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ते विधान चुकीचे असून, आमच्या सरकारने उद्योगपतींचे एक रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही, असा दावा जेटली यांनी केला. येथे पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले की, देशातील ५० निवडक श्रीमंत कुटुंबांचे एक लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत, पण त्यांचा हा आरोप चुकीचा आहे. या सरकारने असे कुठलेही एक रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही. बहुधा ते आपल्या पक्षाच्या पूर्वीच्या सरकारवर आरोप करत असावेत. कारण आज बहुतांश एनपीए त्या लोकांकडे आहे, ज्यांना काँग्रेसच्या नेतृत्वातील तत्कालीन सरकारने कर्ज दिले होते, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारला केंद्राकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.