Join us

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 111 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 12:27 PM

Crude Oil Price Hike: गेल्या महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागारांनी म्हटले होते की, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या खाली राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची गरज नाही.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाने ( Crude Oil) पुन्हा एकदा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा ओपेकचा निर्णय असूनही, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 111 डॉलरच्या वर आहे. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 111 डॉलरवर आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागारांनी म्हटले होते की, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या खाली राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची गरज नाही. पण 110 डॉलर प्रति बॅरलच्या वर किंमत राहिल्यास त्याचा भार ग्राहक, सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांना सहन करावा लागेल. मात्र आता कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 111 डॉलरच्या वर ट्रेड करत असल्याने सरकारी तेल कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली. आणि 6 एप्रिल 2022 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांनी वाढ केली. 6 एप्रिलपासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नजर टाकली तर दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लिटर इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आणि कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसाय