Join us

ब्रिक्स देशांची बँक देणार एप्रिलपासून सदस्यांना कर्ज

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM

पाच ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) येत्या एप्रिलपासून स्थानिक चलनात कर्ज वाटपाला प्रारंभ करील. ही बँक प्रामुख्याने सदस्य

उफा (रशिया) : पाच ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) येत्या एप्रिलपासून स्थानिक चलनात कर्ज वाटपाला प्रारंभ करील. ही बँक प्रामुख्याने सदस्य देशांच्या कर्जाच्या गरजांना प्राधान्य देईल, असे एनडीबीचे अध्यक्ष के.व्ही. कामत यांनी सांगितले. शुक्रवारी येथे ते वृत्तसंस्थेशी बोलत होते.कामत म्हणाले की, ‘अन्य देशांना बँकेचे सदस्य बनवून घेण्याचा निर्णय बँकेचे संचालक मंडळ येत्या काही महिन्यांत घेईल. येत्या एप्रिलपासून कर्ज वाटपाला प्रारंभ होईल, असे मला वाटते.’ एनडीबीच्या सदस्य देशांना (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) विकासासाठी संसाधनांची खूप गरज आहे. ही बँक आपल्या सदस्य देशांना कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा विचार करील, असे ते म्हणाले.१०० अब्ज डॉलरच्या अधिकृत भागभांडवलाने या बँकेची स्थापना झाली आहे. कामत ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी येथे आले होते. ब्रिक्स बँकेची स्थापना करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता.बँकेचे मुख्यालय चीनमध्ये ठेवण्यात आले असून बँकेचे पहिले अध्यक्षपद भारताकडे देण्याचे ठरविण्यात आले होते. के.व्ही. कामत हे पाच वर्षे बँकेचे अध्यक्ष असतील.सदस्य नसलेल्या देशांना कर्ज देण्याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने सदस्य देशांनाच कर्ज देणार आहोत. येत्या काही महिन्यांनंतर आम्ही सदस्यत्व वाढविण्याचा विचार करू. ग्रीसला आर्थिक मदत देणार का असे विचारता कामत म्हणाले की, सदस्य नसलेल्या देशाला मदत करण्याचा आम्हाला अधिकार नाही. ब्रिक्सच्या बाहेर जाण्याचाही मला अधिकार नाही. बँकेच्या विस्ताराबाबत आम्ही बँकेच्या संचालक मंडळाशी चर्चा करू. संचालक मंडळाची बैठक या महिन्यात शांघायमध्ये होणार आहे. डॉलरचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशाने डीएनबी स्थानिक चलनात कर्ज देणार आहे, असा विचार काही जण करतात, यावर कामत म्हणाले की, ‘ब्रिक्स देशांत प्रचंड भांडवल पडून आहे, त्याचा उपयोग करता येऊ शकतो व त्यांच्याकडून कर्जही दिले जाऊ शकते. आम्ही महाग चलनाऐवजी (डॉलर) स्थानिक चलनात कर्ज देण्याचा विचार करू. स्थानिक चलनात कर्ज देण्यामुळे ब्रिक्स देशांना चलन विनिमयातील चढ-उतारांचा फटका बसणार नाही व ही बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे.’ ..................डॉलर आधारित व्यवस्था बदलायचीय!रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन एनडीबीच्या स्थापनेबद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था डॉलरवर खूप अवलंबून आहे. खरे सांगायचे तर ही व्यवस्था अमेरिकन सरकारच्या चलन व आर्थिक धोरणावर अवलंबून आहे. ही व्यवस्था ब्रिक्स देशांना बदलायची आहे.’