एकेकाळी ब्रिटननं भारतावर राज्य केलं, परंतु आज तोच देश पै पै साठी तरसला आहे. स्वातंत्र्यानंतर सात दशकांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेनं मोठी प्रगती केली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं नाव घेतलं जातं. परंतु दुसरीकडे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये ३०० वर्षांतील सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये उत्पादन क्षेत्रात २०२० मधील सर्वाधिक घसरण दिसून आली. यादरम्यान युकेसह संपूर्ण जगात कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव होता. सोमवारी समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जागतिक अर्थव्यवस्थांपैकी मोठ्या असलेल्या ब्रिटनवर या महासाथीचा मोठा परिणाम झाला. यामुळे अन्य देशांच्या तुलनेत ब्रिटनच्या जीडीपीवर मोठा परिणाम झाला आहे.
ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये ब्रिटनच्या जीडीपीमध्ये ११ टक्क्यांची मोठी घसरण झाली. ही घसरण ओएनएसद्वारे वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा खुप जास्त आहे. रिपोर्टनुसार १७०९ नंतर देशाच्या जीडीपीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. ओएनएसनं ९.३ टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता.