इंग्रजांनी २०० वर्ष भारतावर राज्य केलं. अनेकदा लोक म्हणतात की इंग्रजांनी भारताची खूप लूट केली, पण इंग्रजांनी भारतातून किती पैसा लुटला हे तुम्हाला माहितीये का? आता एका रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे. ब्रिटननं १७६५ ते १९०० या कालावधीत भारतातून ६४,८२० अब्ज डॉलर्सची रक्कम काढून घेतली. इतकंच काय तर त्यातील ३३,८०० अब्ज डॉलर्स देशातील १० टक्के श्रीमंतांकडे गेले, असं एका नव्या अहवालात म्हटलं आहे. हा आकडा केवळ १३५ वर्षांत काढलेल्या पैशांचा आहे.
मानवाधिकार संघटना 'ऑक्सफॅम इंटरनॅशनल'च्या ताज्या जागतिक विषमता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठकीच्या काही तास आधी सोमवारी 'टेकर्स, नॉट मेकर्स' हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आधुनिक बहुराष्ट्रीय कंपन्या ही केवळ वसाहतवादाची देणी आहेत, असा दावा अनेक अभ्यास आणि शोधनिबंधांचा हवाल्यानं करण्यात आलाय.
'ऐतिहासिक वसाहतवादी काळातील विषमता आणि लुटमारीच्या विकृती आधुनिक जीवनाला आकार देत आहेत. यामुळे एक अत्यंत असमान जग निर्माण झालंय, एक असं जग जे वांशिक विभाजनानं ग्रासलेलं आहे, असं ऑक्सफॅमनं म्हटलंय. विविध अभ्यास आणि शोधनिबंधांच्या आधारे ऑक्सफॅमनं याची गणना केली आहे. १७६५ ते १९०० या काळात ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांनी आजच्या हिशोबानुसार ३३,८०० अब्ज डॉलर्सची संपत्ती एकट्या भारतातून बाहेर काढली. लंडनच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ ५० ब्रिटीश पौंडांच्या नोटांनी व्यापलं गेलं, तर ती रक्कम त्या नोटांपेक्षा चारपट जास्त असेल,' असं त्यात नमूद करण्यात आलंय.
यांना सर्वाधिक फायदा
१७६५ ते १९०० या १०० वर्षांच्या वसाहतवादी राजवटीत ब्रिटननं भारतातून हडप केलेल्या संपत्तीबद्दल ऑक्सफॅमने म्हटलंय की, श्रीमंतांव्यतिरिक्त वसाहतवादाचा मुख्य लाभार्थी नव्याने उदयास येणारा मध्यमवर्गदेखील होता. वसाहतवादाचा सततचा प्रभाव हे विषारी झाडाचं फळ असल्याचे सांगत ऑक्सफॅमनं, भारतातील केवळ ०.१४ टक्के मातृभाषांना शिक्षणाच्या माध्यमाच्या रुपात वापरलं जातं आणि ०.३५ टक्के शाळांमध्ये शिकवल्या जातात. त्या काळात जात, धर्म, लिंग, लैंगिकता, भाषा आणि भूगोल यासह इतर अनेक विभागांचा विस्तार आणि शोषण केलं गेलं. त्यांना ठोस रूप देण्यात आलं आणि त्यांना अधिक गुंतागुंतीचंही केल्याचं या अहवालात म्हटलंय.