नवी दिल्ली - भारतीय बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून पळालेल्या विजय मल्लाने स्विस बँकेत 170 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मल्ल्याच्या या आर्थिक व्यवहाराला ब्रिटीश सरकारने आक्षेप घेतला होता. तर, युके फायनान्सियल इंटेलिजन्स सर्व्हीस युनिटने (UKFIU) 28 जून 2017 रोजी भारतीय तपास यंत्रणांनाही याबाबत माहिती दिली होती.
भारतातील 13 बँकानी एकत्र येत कारवाई करुन युकेतील मल्ल्याची संपत्ती जप्त करावी, यासाठी युकेएफआययुकडून भारतीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयला मल्ल्याच्या या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती दिली होती. तर नोव्हेंबर 2017 मध्ये ब्रिटनने मल्ल्याविरुद्ध वर्ल्डवाईड फ्रिजिंग ऑर्डर लागू केली होती. मात्र, तत्पूर्वीच मल्ल्याने स्विझर्लंडमधील बँकेत रक्कम जमा केली होती. तत्पूर्वी भारत आणि ब्रिटन यांच्यातील तपास यंत्रणांमध्ये बैठकही झाली होती, अशीही माहिती आहे. 5 जुलै 2018 रोजी एसबीआयने ब्रिटनमध्ये मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासाठी योजना आखली होती. त्यानुसार, सध्या ब्रिटनमधील मल्ल्याची ब्रिटन सरकारच्या ताब्यात असून त्यावर मल्ल्याचे नियंत्रण असणार नाही. दरम्यान, फेब्रुवारी 2016 मध्ये मल्ल्याने डियाजियोपासून मिळालेली 4 कोटी डॉलर (जवळपास 290) कोटी रुपयांची टप्प्या-टप्प्याने काही ट्रस्टच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले आहेत, ज्या ट्रस्टचे लाभार्थी मल्ल्याचे मुले आहेत.