नवी दिल्ली : ब्रिटनने निर्बंध शिथिल करून भारतीय प्रवाशांसाठी खुशखबर दिली आहे. मात्र, विमान प्रवास भाडे प्रचंड वाढल्यामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. ब्रिटनला जाणाऱ्या विमानांचे एका फेरीचे प्रवासभाडे दिड लाख रुपयांवर पोहाचले आहे. याची नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) गंभीर दखल घेतली असून विमान कंपन्यांकडून याप्रकरणी अहवाला मागविला आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर निर्बंध लावले हाेते. तब्बल साडेतीन महिन्यांनी भारतीयांना दिलासा मिळाला आहे. ब्रिटनने भारताचा ‘रेड’ यादीतून ‘ॲम्बर’ यादीत समावेश केला आहे. काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांना आता १० दिवसांच्या क्वारंटाईनची सक्ती करण्यात येणार नाही. मात्र, भारतीयांवर चिंता आता वाढली आहे ती म्हणजे प्रवास भाड्यामुळे. ऑगस्ट महिन्यात व्हीस्तारा एअरलाईन्सचे दिल्ली-लंडन विमान प्रवासभाडे १ लाख ३ हजार ते १ लाख २१ हजार रुपयांपर्यंत, ब्रिटिश एअरवेजचे भाडे १ लाख २८ हजार ते १ लाख ४७ हजार रुपये हाेते. एअर इंडियासाठी हेच भाडे १ लाख १५ हजार रुपये हाेते. तर व्हर्जिन अटलांटिकचे १ लाख २८ हजार रुपये प्रवासभाडे हाेते.
काेराेनामुळे सध्या दर आठवड्यात ३० उड्डाणांची मर्यादा आहे. त्यामुळे प्रवासी संख्येवरही मर्यादा आहेत. तसेच सरकारला हे भाडे नियंत्रित ठेवण्याचे काेणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे उड्डाणे वाढल्याशिवाय प्रवासभाडे कमी हाेण्याची शक्यता नाही.
सप्टेंबरमध्ये प्रवासभाडे घटण्याची शक्यता
या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार भारत आणि अमेरिकेदरम्यान उड्डाणे वाढविल्यास प्रवासभाडे घटण्याची शक्यता आहे. ब्रिटनने साडेतीन महिन्यांनंतर निर्बंध उठविल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सर्व कंपन्यांच्या उड्डाणांमध्ये अतिशय कमी जागा उपलब्ध आहेत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत प्रवासी संख्या घटण्याची शक्यता असून त्यानंतर प्रवासभाडे कमी हाेतील, असे चित्र आहे.