नवी दिल्ली : सीआयआय च्या वतीने आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी भारतीय व्यावसायिकांसाठी विशेष व्हिसा योजनेची घोषणा केली. भारतीय नागरिकांसाठी आम्ही ‘नोंदणीकृत प्रवास योजना सादर करीत आहोत, असे टेरेसा मे यांनी सांगितले. नियमितपणे ब्रिटनला जाणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ होईल. पंतप्रधान टेरेसा मे यांनी आपल्या भाषणात टाटा उद्योग समूहाचा विशेष उल्लेख केला. ब्रिटनमध्ये ८00 भारतीय कंपन्या आहेत. जग्वार लँड रोव्हरची मालक कंपनी टाटा ही आमची सर्वांत मोठी वस्तू उत्पादन कंपनी आहे, असे मे यांनी सांगितले.दरम्यान, भारत आणि पाकिस्तान आपल्या तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करून नव्या संधी निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिटनने भारतात संरक्षण, वस्तू उत्पादन आणि विमान निर्मिती या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे ते म्हणाले.भारत-ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी यांनी वरील वक्तव्य केले. भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांची या परिषदेला उपस्थिती होती. मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देश एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या व्यावसायिक प्रणालींसाठी गतिशील आणि अधिक ऊर्जापूर्ण वातावरण तयार करू शकतो. सध्याच्या जागतिक वातावरणात दोन्ही देशांना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्याचा व्यापार आणि व्यवसायावर सरळ परिणाम होत आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करून या समस्येतून मार्ग काढता येईल. मोदी म्हणाले की, भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी आहेत. मेक इन इंडिया योजना द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्त्वपूर्ण ठरेल. संरक्षण, वैमानिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रातत गुंतवणूक करून ब्रिटन आमच्या उदार एफडीआय धोरणांचा लाभ उठवू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारतीय व्यावसायिकांसाठी ब्रिटनची खास व्हिसा योजना
By admin | Published: November 08, 2016 3:32 AM