नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त आहे. यातच आता दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. मात्र, 10 रुपयांच्या पॅक्ड दह्याची किंमत 15 रुपयांपर्यंत वाढेल, इतकी अपेक्षा कोणी केली नसेल. दरवाढ आधीच ठरलेली होती. पण, 10 रुपयांची वस्तू थेट 15 रुपयांची होईल, हा निर्णय थक्क करणारा आणि लोकांना अस्वस्थ करणारा आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पहिल्यांदाच दुधापासून बनवलेल्या पॅकेज्ड प्रोडक्ट्सचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला आहे. दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी 18 जुलैपासून देशभर लागू करण्यात आला आहे. पॅकेज्ड दुग्धजन्य पदार्थांवर सरकारने 5 टक्के जीएसटी निश्चित केला आहे. पण, आता कंपन्या किंमती 50 टक्क्यांपर्यंत वाढवत आहेत.
देशातील सर्व नामांकित कंपन्या पॅक्ड दही पुरवतात, त्यापैकी एक Britannia आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत 80 ग्रॅम, 150 ग्रॅम आणि 400 ग्रॅम पॅक्ड दही विकते. आतापर्यंत बाजारात 80 ग्रॅम पॅक्ड दह्याची किंमत 10 रुपये होती. मात्र आजपासून तेच 80 ग्रॅम पॅक्ड केलेले ब्रिटानिया दही बाजारात 15 रुपयांना विकले जात आहे. म्हणजेच कंपनीने याची किंमत थेट 10 रुपयांवरून 15 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 10 रुपयांच्या दहीसाठी ग्राहकांना आता 5 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
सरकारने पॅक्ड दह्यावर 5 टक्के जीएसटी लावला आहे, पण आता कंपन्या जीएसटीचे कारण देत किमतीत वाढ करत आहेत. नियमांनुसार, 10 रुपयांच्या दह्याची किंमत 5 टक्के जीएसटी लागू झाल्यानंतर 10.50 रुपयांपर्यंत वाढायला हवी होती. मात्र कंपन्या मनमानी पद्धतीने किमती वाढवत आहेत. त्याचा थेट फटका आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
यापूर्वी गेल्या महिन्यात जीएसटी लागू होताच सुधा कंपनीने दही, लस्सी आणि ताक यांच्या दरात वाढ केली होती. 10 रुपयांची 150 ML सुधाची लस्सी 12 रुपयांना उपलब्ध आहे. 140 ML मँगो लस्सीची किंमत आता 10 ऐवजी 12 रुपये झाली आहे. तसेच, 180 ML ताकाच्या दरात 10 रुपयांवरून 12 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर 80 ग्रॅम दही जे पूर्वी 10 रुपयांना मिळत होते, ते आता 12 रुपयांवर आणले आहे. दरम्यान, दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या सर्व कंपन्या दर वाढवणार आहेत. पण, ब्रिटानियाने ज्या पद्धतीने किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.