Join us

ब्रिटानियाचा 50-50 प्लॅन; 2024 पर्यंत कंपनीत महिला कर्मचारी वाढणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 11:21 AM

Britannia Industries : अमित दोशी म्हणाले की, कंपनीने देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी गुगलशी करार केला आहे.

नवी दिल्ली : ब्रिटानिया इंडस्ट्रीजने (Britannia Industries) 2024 पर्यंत महिलांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण 38 टक्के आहे. कंपनीमध्ये आम्ही स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहित करणार आहोत, असे ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे मुख्य विपणन अधिकारी (सीएमओ) अमित दोशी यांनी सांगितले. 

एफएमसीजी उत्पादने (FMCG Products) बनवणाऱ्या कंपनीच्या गुवाहाटी कारखान्यात काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण 60 टक्के आहे. कंपनी ही संख्या 65 टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे अमित दोशी यांनी सांगितले. तसेच, अमित दोशी म्हणाले की, कंपनीने देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी गुगलशी करार केला आहे.

याचबरोबर, अमित दोशी यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना सक्षम करण्यासाठी कंपनीने महिला उद्योजकांसाठी 'स्टार्टअप चॅलेंज' (Startup Challenge) आधीच सुरू केले आहे. कंपनीने आतापर्यंत 30 महिला उद्योजकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे सुरुवातीला भांडवल उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम महिला उद्योजकांना ई-कॉमर्स, डिजिटल सेवा, मोबाईल व्हॅनद्वारे डोळ्यांची काळजी आणि मुलांचे शिक्षण यासारख्या क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतातील प्रमुख खाद्य कंपन्यांपैकी एक100 वर्षांचा वारसा असलेली ही कंपनी भारतातील प्रमुख खाद्य कंपन्यांपैकी एक आहे. ही वाडिया ग्रुपची कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. कंपनीचा वार्षिक महसूल 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनी Good Day, Tiger, NutriChoice, Milk Bikis आणि Marie Gold या ब्रँड नावाने खाद्यपदार्थांची विक्री करते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये बिस्किटे, ब्रेड, केक, रस्क आणि डेअरी उत्पादने समाविष्ट आहेत. कंपनीची 60 पेक्षा जास्त देशांमध्ये उत्पादने आहेत. युएई आणि ओमानच्या टॉप बिस्किट ब्रँडमध्येही कंपनीचा समावेश आहे. कंपनी नेपाळमधील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे.

टॅग्स :व्यवसायकर्मचारीमहिला