मुंबई : ब्रिटिश काळात उभारण्यात आलेले देशभरातील १५०० पूल पाडले जाणार आहेत. त्या जागी उभे राहणारे नवीन पूल पूर्णपणे स्टीलचे असतील. २०३० पर्यंत देशातील स्टीलचे वार्षिक उत्पादन ३० कोटी टनापर्यंत नेण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय पोलादमंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी दिली.
स्टील क्षेत्रातील लघू व मध्यम उद्योजकांच्या स्टील री रोलर्स असोसिएशन आॅफ महाराष्टÑची (एसआरएएम) राष्टÑीय परिषद शुक्रवारी झाली. त्या निमित्ताने सिंह यांनी पत्रकार परिषदेत रिअल इस्टेटमधील मंदीमुळे स्टील क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे मान्य केले.
चौधरी बिरेंद्र सिंह म्हणाले की, देशातील स्टीलचे वार्षिक उत्पादन दोन वर्षे आधी ९ कोटी टन होते. केंद्र सरकारने ३० कोटीचे लक्ष्य निश्चित केल्यानंतर, आता हे उत्पादन १३.४० कोटी टनावर आले आहे. २०२० पर्यंत ते १८ कोटीवर जाईल, पण स्टीलला बांधकाम क्षेत्रातून मागणी होत नसल्याने, सरकारनेच आता अधिकाधिक पोलादा वापरण्याचा निर्णय घेतला. पुलांची निर्मिती १०० टक्के स्टीलने होईल. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत तयार होणारी ३ कोटी घरेही पूर्णपणे स्टीलची असावीत, असा प्रयत्न आहे. ही घरे तीन महिन्यात उभी होतील. गरज भासल्यास पुन्हा फोल्डही करून ठेवता येणारी घरे उभारता येतील का? याची चाचणी सुरू आहे.
स्टील मंत्रालयाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा म्हणाल्या की, पोलादी पूल १०० वर्षे टिकतात, हे हावरा ब्रिजसारख्या बांधकामावरून स्पष्ट होते. देशभरातील अशा ७० टक्के पायाभूत सुविधांमध्ये १०० टक्के स्टीलचा वापर करता येईल. तसा आराखडा तयार केला जात आहे. एसआरएएमचे संचालक योगेश मंधानी यांच्यासह स्टील उद्योजक, लोहखनिज क्षेत्रातील तज्ज्ञ आदी या वेळी उपस्थित होते.
>१० लाख कोटींची गरज
स्टील क्षेत्रातील अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या असल्या, तरी नवीन दिवाळखोरी नियमावली कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त आहे. त्यामुळेच या क्षेत्रात १० लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज आहे. त्यापैकी ३५ टक्के अर्थसाहाय्य बँकांनी करावे, असे आवाहन चौधरी बिरेंद्र सिंह यांनी केले.
ब्रिटिशकालीन १५०० पूल होणार ‘पोलादी’
ब्रिटिश काळात उभारण्यात आलेले देशभरातील १५०० पूल पाडले जाणार आहेत. त्या जागी उभे राहणारे नवीन पूल पूर्णपणे स्टीलचे असतील.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:32 PM2018-05-18T23:32:17+5:302018-05-18T23:32:17+5:30