ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांची गुंतवणूक कंपनी कॅटामरान व्हेन्चर्स युके लिमिटेड (Catamaran Ventures UK Ltd) बंद होणार आहे. ब्रिटनच्या कंपनी हाऊसला पाठवलेल्या पत्रात कंपनीनं ही माहिती दिली आहे. अक्षता यांच्या या व्हेन्चरची किंमत सुमारे ५९ कोटी पौंड (सुमारे ६ हजार कोटी रुपये) होती. ही गुंतवणूक फर्म ८३२० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता हाताळते. ४३ वर्षीय अक्षता यांनी २०१३ मध्ये याची स्थापना केली होती. या कंपनीच्या संचालक मंडळात ऋषी सुनक यांचाही समावेश होता. सुनक यांनी २०१५ मध्ये संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
कॅटामरान व्हेन्चर्स युके लिमिटेडच्या सर्व गुंतवणूक यशस्वी झाल्या नाहीत. कॅटामरान व्हेन्चर्स युके लिमिटेडनं एडटेक स्टार्टअप मिसेस वर्डस्मिथ मध्ये गुंतवणूक केली होती, जी नंतर बंद झाली. याशिवाय कॅटामरानमध्ये गुंतवलेल्या फर्निचर कंपनी न्यू क्राफ्ट्समनला ब्रिटिश सरकारकडून काही फायदे मिळाले होते, त्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. कॅटामरानमध्ये भागीदारी असलेल्या शैक्षणिक तंत्रज्ञान फर्म स्टडी हॉलला गेल्या वर्षी सरकारी संस्था इनोव्हेट युकेमधून ३.५० लाख पौंडांचं अनुदान मिळालं होतं, यावरून लेबर पार्टीनं प्रश्न उपस्थित केले होते.
अक्षता या कंपनीतील एकमेव संचालक
डिसेंबर २०२२ ला संपणाऱ्या वर्षाशी संबंधित कंपनीची आर्थिक कागदपत्रे अलीकडेच सार्वजनिक झाली आहेत. या कागदपत्रांनुसार कंपनीच्या एकमेव संचालक असलेल्या अक्षता मूर्ती यांनी आता ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी हाऊसला पाठवलेल्या पत्रात गेल्या वर्षीच संचालकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
इन्फोसिसची ०.९१ टक्के भागीदारी
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, अक्षता यांच्याकडे इन्फोसिसमध्ये ०.९१ टक्के हिस्सा आहे. यामुळे त्यांना दरवर्षी लाभांश म्हणून मोठी रक्कम मिळते. या रकमेतून अक्षता यांनी कॅटामरान व्हेंचर्सची स्थापना केली. २०२२ मध्ये कंपनीच्या गुंतवणुकीचं मूल्य ३८ लाख पौंडांपेक्षा थोडे अधिक होतं, जे २०२१ मध्ये ३५ लाख पौंडांपेक्षा जास्त होतं. अक्षता मूर्ती यांच्यावर कंपनीचं ४६ लाख पौंडांपेक्षा जास्त देणं आहे.