Lokmat Money > बिझनेस न्यूज > ब्रिटिश धक्क्याने बाजाराला तडे!

ब्रिटिश धक्क्याने बाजाराला तडे!

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर भारतीय बाजारासह जगभरातील बाजाराला शुक्रवारी मोठे तडे बसले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६0४.५१ अंकांनी घसरून २६,३९७.७१ अंकांवर बंद झाला

By admin | Published: June 25, 2016 02:59 AM2016-06-25T02:59:36+5:302016-06-25T02:59:36+5:30

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर भारतीय बाजारासह जगभरातील बाजाराला शुक्रवारी मोठे तडे बसले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६0४.५१ अंकांनी घसरून २६,३९७.७१ अंकांवर बंद झाला

The British shocked the market! | ब्रिटिश धक्क्याने बाजाराला तडे!

ब्रिटिश धक्क्याने बाजाराला तडे!

मुंबई : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर भारतीय बाजारासह जगभरातील बाजाराला शुक्रवारी मोठे तडे बसले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६0४.५१ अंकांनी घसरून २६,३९७.७१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये गेल्या चार महिन्यांत एकच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण असून, त्यामुळे गुंतवणूकदारांचे १.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
युरोपीय महासंघात राहावे की नाही, याबाबत गुरुवारी सार्वमत घेण्यात आले होते. महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने बहुमत आल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली. ३0 शेअर्सचा सूचकांक घसरणीनेच २६,३६७.४८ वर खुला झाला. त्यानंतर त्यात सतत घसरण होत गेली. एक वेळ तो घसरून २६ हजारांच्या खाली गेला आणि २५,९११.३३ या नीचांकी स्तरावर पोहोचला; मात्र त्यानंतर खरेदी झाल्याने त्यात सुधारणा झाली आणि ६0४.५१ अंकांनी म्हणजे २.२४ टक्क्यांनी घसरून २६,३९७.७१ अंकांवर बंद झाला.
११ फेब्रुवारीनंतर सेन्सेक्सचा हा नीचांकी स्तर आहे. ५0 शेअर्सचा निफ्टीसुद्धा एक वेळ ८,000 अंकांपेक्षा खाली घसरला व ७,९२७.0५ या नीचांकी स्तरावर पोहोचला. त्यानंतर तो १८५ अंकांनी म्हणजे २.२0 टक्के वधारत ८,0८८.६0 अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)

या कंपन्यांना फटका
ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. टाटा मोटर्स, टाटा स्टील, भारती फोर्ज, इन्फोसिस, टीटीएस, हिंदाल्को, टेक महिंद्रा यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. ही घसरण इतकी व्यापक होती की, ३0 पैकी २३ कंपन्या तोट्यात गेल्या.
टाटा मोटर्स, टाटा स्टील, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, आयआयएल, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, टीसीएस, अदानी पोर्टस् यांचे शेअर्स ७.९९ टक्क्यांपर्यंत घसरले.

धक्के सहन करण्यासाठी भारताकडे पर्याप्त सुरक्षा
बीजिंग : युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडत असल्याने त्याचे जे परिणाम होतील त्यांना तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. हे धक्के सहन करण्यासाठी भारताकडे पर्याप्त सुरक्षा आहे, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. जेटली म्हणाले की, आमची सुरक्षेची भिंत मजबूत आहे. ब्रिटनमधील जनमत संग्रहानंतर जागतिक बाजारात चढ-उतार अपेक्षित आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य संस्था कोणत्याही प्रकारच्या चढ-उताराचा सामना करण्यासाठी तयार आहेत. सर्वच देशांना सज्ज राहावे लागेल. एशियन एन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) बैठकीत भाग घेण्यासाठी जेटली येथे आलेले आहेत.

प्रभाव पडणार नाही
ब्रिटनच्या निर्णयाचा भारतावर प्रभाव पडणार नाही. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सरकारकडे अनेक उपाययोजना आहेत. - शक्तिकांत दास, वित्त सचिव


आशियायी बाजारात घसरण; तेल बाजारात गोंधळाचे वातावरण
हाँगकाँग : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर शुक्रवारी पौंड ३१ वर्षांतील नीचांकी स्तरावर घसरला, तसेच चलन, इक्विटी आणि तेल बाजारातही प्रचंड गोंधळाचे वातावरण राहिले. त्यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेची
लाट आली. पौंड स्टर्लिंग एक वेळ १0 टक्क्यांनी घसरून १.३२२९ डॉलरवर आला. हा १९८५ नंतरचा आतापर्यंतचा नीचांकी स्तर आहे. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित केल्याने डॉलर गेल्या अडीच वर्षांत प्रथमच येनच्या तुलनेत १00 येनच्या स्तराच्या खाली गेला. ब्रेक्झिटचा निर्णय आल्यानंतर शुक्रवारी बाजारात प्रचंड चढ-उतार झाले. २00८ साली झालेल्या आर्थिक मंदीनंतर शुक्रवारचा दिवस अत्यंत खराब राहिला. युरोपीय महासंघात असलेल्या तीन बड्या आर्थिक महासत्तांमध्ये ब्रिटनचा समावेश होतो. चार दशकांनंतर ब्रिटन या संघटनेतून बाहेर पडला आहे.ब्रिटनच्या या निर्णयानंतर युरोपीय महासंघातील अन्य देशही सार्वमताची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६0 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या युरोपीय महासंघाच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या घटनाक्रमात टोकियोचा बाजार ८ टक्के, सिडनी ३.२ टक्के, सोल ३.१ टक्के, शांघाय १.३ टक्के घसरले. तायपेयी, वेलिंग्टन, मनिला,
जकार्ता येथील बाजारातही घसरण झाली.

जागतिक बाजारात जपानचा निक्केई ७.९२ टक्के, हाँगकाँगचा हँगसँग २.९२ टक्के घसरले. युरोपीय बाजारातही घसरण झाली. लंडनच्या एफटीएसई ५.0 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. एक वेळ तो ९.0 टक्क्यांपर्यंत घसरला होता.

रघुराम राजन म्हणाले...
युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर बाजारात निर्माण झालेल्या परिस्थितीवर रिझर्व्ह बँक लक्ष
ठेवून असून, कोणत्याही अस्ताव्यस्त परिस्थितीचा
मुकाबला करण्यास भारत सज्ज आहे.
‘ब्रेक्झिट’च्या कौलाचा परिणाम सहन करण्याची बाजार क्षमता राखून असून, तशी तयारी केलेली आहे. जगभरातील बाजारात मोठी घसरण झाली; तशी भारतातही घसरण झाली. आवश्यकता पडल्यास आम्ही हस्तक्षेप करण्यास तयार आहोत.
भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. अल्पकालिक बाह्यकर्ज कमी असून, विदेशी गंगाजळी विशाल आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत देश मजबूतपणे उभा राहील.
बाजारात गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. जेव्हा जेव्हा तरलतेची आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा डॉलर आणि रुपया उपलब्ध केले जातील.

Web Title: The British shocked the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.