Join us

शेअर बाजारात खरेदीची लाट, Adani चे शेअरही सुस्साट; सेन्सेक्सची ९०० अंकांची उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 4:13 PM

शुक्रवारी आठवड्याच्या कामाकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. अदानींच्या कंपन्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात जोरदास उसळी पाहायला मिळाली. दुपारी अडीचच्या सुमारास शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजारांपेक्षा अधिक अंकांच्या वाढीसह ५९,९०० रुपयांच्या जवळ पोहोचला होता. तर निफ्टीही १७,६०० अंकांच्या वर पोहोचला. परंतु कामकाजाच्या अखेरीस शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८९९.६२ अंकांची वाढ होऊन तो ५९,८०८.९७ अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये १.५७ टक्क्यांची वाढ होऊन तो १७,५९४.३५ अंकांवर पोहोचला. निफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.

अमेरिकेतील गुंतवणूक फर्म GQG पार्टनर्सनं अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या बातमीनंतर NSE वर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये १६.६० टक्के आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये ९.७६ टक्क्यांची तेजी दिसून आली. “हे पैसे मुख्यत्वे कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील, याचा अर्थ अदानींच्या कंपन्यांना फंडिंग करणाऱ्या बँकांना कोणतीही अडचण येणार नाही. बँक निफ्टीसाठी ही चांगली बातमी आहे,” अशी प्रतिक्रिया जिओजित फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर व्हिके विजयकुमार यांनी दिली.शुक्रवारचा दिवस अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी दिलासादायक ठरला. दरम्यान, कामकाजाच्या अखेरच्या सत्रात अदानी पोर्ट्सचे शेअर ९.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६८३.७० रुपयांवर पोहोचले. तर अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअरमध्ये १६.६० टक्क्यांची वाढ होऊन ते १८७४ रुपयांवर गेले. तर दुसरीकडे अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. यानंतर अदानी ग्रीनचे शेअर्स ५६१.७५ रुपयांवर, तर अदानी पॉवरचे शेअर १६९.३० रुपयांवर पोहोचले.

फेडचे संकेतएफओएमसी मिनिट्सद्वारे कठोर भूमिका जाहीर केल्यानंतर पुढील बैठकीत ५० बेसिस पॉईंट्सची वाढ होण्याची शक्यता वाढली होती. परंतु गुरुवारी अटलांटा फेडरल रिझर्व्हचे प्रेसिडेंट राफेल बोस्टिक यांनी सेंट्रल बँक अर्ध्या टक्क्याऐवजी २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करेल असं म्हटलं.

वॉल स्ट्रीट, आशियाई बाजारातही उत्साहफेडच्या संकेतांनंतर, डाऊ जोन्सचा १३ फेब्रुवारीपासूनचा सर्वोत्तम दिवस होता आणि गुरुवारी तो ३४० अंकांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी एसअँडपी ५०० तर नॅस्डॅकमध्ये ०.७३ टक्क्यांची वाढ झाली. वॉल स्ट्रीटच्या संकेतांनंतर, आशियाई बाजार ३ मार्च रोजी उच्चांकी पातळीवर उघडले. हाँगकाँगच्या हँगसांग निर्देशांकाव्यतिरिक्त निक्केईनेही वेग पकडला.

टॅग्स :शेअर बाजारअदानीगुंतवणूक