सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. याची किंमत फक्त ३९७ रुपये आहे. याची वैधता १५० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ४जी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसाठी या प्लॅनकडे मोठं आव्हान म्हणून पाहिलं जात आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केल्यानंतर बीएसएनएलनं हे पाऊल उचललं आहे. यामुळे मोठ्या संख्येने युजर्स बीएसएनएलकडे वळत आहेत.
बीएसएनएल देशभरात आपली ४जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं प्रमुख शहरं आणि टेलिकॉम सर्कलमध्ये २५,००० पेक्षा जास्त नवीन ४ जी टॉवर उभारले आहेत. बीएसएनएलला बळकटी देण्यासाठी सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात ८३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून सरकारचा बीएसएनएलचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याच्या दिशेनं असलेली बांधिलकी दिसून येते.
डेटा आणि फ्री कॉलिंगही
बीएसएनएलचा हा नवा प्लॅन दुसरा सिम वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये केवळ लॉन्ग व्हॅलिडिटीच नाही तर भरपूर डेटा आणि फ्री कॉलही मिळतात. या प्लॅनमध्ये पहिल्या ३० दिवसांसाठी कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. यानंतर उर्वरित १५० दिवस युजर्स फ्री इनकमिंग कॉलचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय यात पहिल्या महिन्यासाठी दररोज २ जीबी डेटा चा समावेश आहे. यानंतर ४० केबीपीएस च्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा मिळतो. हा प्लॅन रिलायन्स जिओसारख्या दिग्गजांना आव्हान देऊ शकतो.
बीएसएनएलचा असा विश्वास आहे की हा प्लॅन परवडणाऱ्या प्लॅनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना आकर्षित करेल. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीनं उचललेलं हे पाऊल टेलिकॉम मार्केटच्या डायनॅमिक्समध्ये मोठा बदल घडवून आणू शकतं. हा प्लॅन बीएसएनएलच्या मोठ्या ४जी रोलआऊटमधील एक धोरणात्मक पाऊल मानला जात आहे.