नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात फाईव्ह जी आणि इंटरनेट तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी जपानच्या सॉफ्टबँक तसेच एनटीटी कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतात फाईव्ह जी तसेच इंटरनेट तंत्रज्ञान जलद करण्यासाठी सॉफ्टबँक तसेच एनटीटीसोबत करार केला आहे.
या समझोत्यानुसार स्मार्ट शहरांमध्ये अधिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न राहील. बीएसएनएलची अनेक स्पर्धा देशात फोर जी सेवेमार्फतच अद्यापही पैसा कमवू इच्छितात. त्यामुळेच जगातील आघाडीच्या कंपन्या भारतात फाईव्ह जीच्या सुरुवातीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडे मोठ्या आशेने पाहतात. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी फाईव्ह जीसाठी जागतिक स्तरावर अनेक बैठका घेतल्याचे हे फलित आहे. आम्ही या संधीचा लाभ घेत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी करार केला.
विदेशी बाजारात थ्री जी सेवा आधी सुरू झाली आणि भारतात तीन वर्षानंतर आली. फोर जी सेवा चार वर्षांच्या विलंबाने सुरू झाली. पण फाईव्ह जी सेवेची सुरुवात भारतात सर्व नियमांसह २०२० त होऊ शकेल. कुठल्या क्षेत्रात फाईव्ह जीचा अधिक वापर होऊ शकतो, हे शोधण्यावर बीएसएनएल भर देत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. सॉफ्ट बँकसोबतच्या करारांतर्गत बीएसएनएल जपानी कंपनीच्या उपग्रहांचा वापर जलद इंटरनेट सेवा देण्यासाठी करणार आहे. बीएसएनएलने फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नोकिया आणि सिस्कोसोबतदेखील करार केला आहे.
आता 4G विसरा... BSNL घेऊन येतंय सुस्साट 5G
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात फाईव्ह जी आणि इंटरनेट तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी जपानच्या सॉफ्टबँक तसेच एनटीटी कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:31 AM2018-09-24T04:31:00+5:302018-09-24T11:05:33+5:30