टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं (ट्राय) शुक्रवारी एक धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) यांनी जुलैमध्ये पहिल्यांदाच एका महिन्यात मोठ्या संख्येने ग्राहक गमावले आहेत. याचं मुख्य कारण जुलैच्या सुरुवातीला कंपन्यांच्या टॅरिफमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन खासगी टेलिकॉम कंपन्यांनी जुलैमध्ये ११ ते २५ टक्क्यांनी दरवाढ केली होती. सरकारी कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) दरवाढ केली नाही. अशा तऱ्हेने नवीन ग्राहक जोडणारी बीएसएनएल ही एकमेव टेलिकॉम कंपनी होती.
BSNL ला फायदा, एअरटेल-जिओला नुकसान
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) शुक्रवारी जाहीर झालेल्या मासिक अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही एकमेव कंपनी आहे ज्याने गेल्या महिन्यात नवीन ग्राहक ग्राहक जोडण्याच्या बाबतीत बाजारात आघाडी घेतली. रिपोर्टनुसार, बीएसएनएलनं जुलैमध्ये २९.४ लाखांहून अधिक मोबाइल ग्राहक जोडले. दुसरीकडे, भारती एअरटेलनं १६.९ लाख मोबाइल ग्राहक गमावले, जे इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. व्होडाफोन आयडिया (व्हीआय) आणि रिलायन्स जिओनं अनुक्रमे १४.१ लाख आणि ७.५८ लाख मोबाइल ग्राहक गमावले. एकंदरीत जुलै महिन्यात देशातील टेलिकॉम ग्राहकांची संख्या किरकोळ कमी होऊन झाली.
दरवाढीनंतर ईशान्य भारत, महाराष्ट्र, राजस्थान, मुंबई, कोलकाता, तामिळनाडू, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, हरयाणा, आंध्र प्रदेश टेलिकॉम सर्कलमधील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. वायरलाइन किंवा फिक्स्ड लाइन कनेक्शन सेगमेंटमधील ग्राहकांची संख्या जुलैमध्ये सुमारे एका टक्क्यानं वाढली.