BSNL D2D Service : मोबाईल नेटवर्क क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आता पुन्हा फॉर्मात आली आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा कंपनीने बीएसएनएलसोबत करार केला होता. त्यानंतर कंपनीचे दिवसच फिरल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांत बीएसएनएलमध्ये ६० लाखांहून अधिक नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) हळूहळू भारतातील लोकप्रिय सरकारी दूरसंचार कंपनी बनण्याची तयारी करत आहे. सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर लाखो वापरकर्त्यांनी आपला मोर्चा BSNL कडे वळवला आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी करत आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने अलीकडेच इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये आपला नवीन लोगो आणि स्लोगन लाँच केले होते. तसेच आपल्या ७ नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या ७ सेवांपैकी एक BSNL ची D2D म्हणजेच "डिरेक्ट टू डिव्हाईस" सेवा आहे. BSNL च्या D2D सेवेसह, लोक सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतात. BSNL ची D2D सेवा काय आहे आणि ती कशी कार्य करते ते जाणून घेऊया.
BSNL ची D2D (डायरेक्ट-टू-डिव्हाइस) सेवा
बीएसएनएलच्या D2D सेवेत लोकांना सॅटेलाइटद्वारे कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये लोक कोणत्याही सिमकार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतात. ज्या भागात मोबाईल नेटवर्क नाही अशा ठिकाणी ही सेवा खूप फायदेशीर आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीच्या काळातही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नेटवर्क अनेकदा ठप्प होते. अशा परिस्थितीत बीएसएनएलची ही सेवा अशावेळी खूप उपयुक्त ठरणार आहे.
D2D सेवा कशी काम करते?
बीएसएनएलची D2D सेवा सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे काम करते. सॅटेलाइट आकाशातील मोठमोठ्या टॉवर्सप्रमाणे काम करतात. कॉलिंगला सपोर्ट करण्यासाठी, ते एका मोबाइलला दुसऱ्या मोबाइलला जोडते, ज्यामुळे कॉलिंग शक्य होते. सध्या बीएसएनएल या सेवेची चाचणी घेत आहे. बीएसएनएलने यासाठी वायसॅट नावाच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. वायसॅट कंपनी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पुरवते.