लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीएसएनएल आणि एमटीएनएल यांना सरकारकडून पुनरुज्जीवन पॅकेज मिळाल्यानंतर या दोन्ही कंपन्या वर्षभराच्या आत नफ्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा लोकसभेत केली होती. त्यानुसार बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्यासाठी सरकारकडून पुनरुज्जीवन योजना राबविण्यात आली. त्यानंतर पहिल्या सहा महिन्यांतच चांगला परिणाम दिसून आला आहे. कंपन्यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार बीएसएनएल आणि एमटीएनएल यांचे व्याज, कर, घसारा आणि कर्ज हप्ते भरण्यापूर्वीचे (ईबीआयटीडीए) उत्पन्न नकारात्मकतेतून सकारात्मक झाले आहे. सप्टेंबर २०१९ ला संपलेल्या वर्षातील ‘ईबीआयटीडीए’ उणे ३,५९६ कोटी होते. ते पुढील सहा महिन्यांत सकारात्मक (पॉझिटिव्ह) ६०२ कोटी रुपये झाले. एमटीएनएलचे ‘ईबीआयटीडीए’ उणे ५४९ कोटींवरून वाढून सकारात्मक २७६ कोटी रुपये झाले.
दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये दोन्ही कंपन्या आपला तोटा ५० टक्क्यांनी भरून काढतील, असा अंदाज आहे. दोन्ही कंपन्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवून आपले वेतन बिल मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. हेही कंपन्यांची कामगिरी सुधारण्यामागील एक कारण आहे. बीएसएनएलने ५० टक्के, तर एमटीएनएलने ७५ टक्के कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली आहे.
डिजिटल इंडिया योजनेला गती
एकीकडे खर्च कपात करतानाच महसूल कायम ठेवण्यात बीएसएनएलने
यश मिळविले आहे. कंपनी ‘फायबर-टू-द-होम’ प्रकल्प गतीने विस्तारित करीत आहे. त्याचाही फायदा कंपनीला झाला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीची मोबाइल क्षेत्रातील हिस्सेदारी वाढून १०.३६ टक्के झाली आहे, असे ट्रायच्या आकडेवारी-वरून दिसते. सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेला त्यामुळे गती मिळाली आहे.