खासगी टेलिकॉम कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी रिचार्ज महाग केले होते. यावेळी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपण प्लॅन्सचे दर वाढविणार नसल्याचे म्हटले होते. परंतू, नुकतेच कंपनीने काही प्लॅन्सचे दर वाढविले आहे, तर काही प्लॅन्सची व्हॅलिडीटी कमी केली आहे. यामुळे देशभरातील ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या आठवड्यात बीएसएनएलने ९९ रुपये, ११८ रुपये आणि ३१९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे बेनिफिट्स कमी केले होते. आता कंपनीने ९९९ आणि १४९९ रुपयांच्या प्लॅनबाबतही असेच केले आहे.
आता कंपनीने 1498 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढविली आहे. आता हा प्लॅन 1515 रुपयांना मिळत आहे. 999 रुपयांचे रिचार्ज आधी 240 दिवसांच्या व्हॅलिडीचे येत होते. १ जुलै पासून कंपनीने व्हॅलिडीटी ४० दिवसांनी घटविली आहे. म्हणजेच या प्लॅनचा दर दिवसाचा खर्च 4.16 रुपयांवरून 4.99 रुपये झाला आहे. या प्लॅनमध्ये युजरला फक्त व्हॉईस कॉलिंग मिळते. एसएमएस आणि डेटा मिळत नाही.
1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील कंपनीने व्हॅलिडीटीवर कात्री चालविली आहे. यामध्ये व्हॉईस कॉलिंगसह डेली १०० एसएमएस आणि २४ जीबी डेटा दिला जातो. मात्र, कंपनीने व्हॅलिडीटी ३६५ दिवसांवरून ३३६ दिवसांवर आणली आहे. याची डेली कॉस्ट 4.10 रुपयांवरून 4.46 रुपये झाली आहे.
अशाप्रकारे कोणत्याही प्लॅनमध्ये व्हॅलिडीटी कमी करणे म्हणजे इनडायरेक्ट किंमत वाढच असते. गेल्या वर्षी प्लॅन्समध्ये वाढ केलेली नसली तरी आता कंपनी हळूहळू दर वाढवू लागली आहे.