Join us

Budget 2018: शेअर बाजारात 'खलिवलि'; सेन्सेक्स-निफ्टीची वाट लागली!  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 11:28 AM

गेल्या काही दिवसांपासून नवनवी शिखरं गाठत 36 हजाराच्या वर गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गडगडला आहे. ­केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर वाढवल्याची घोषणा केली सेन्सेक्स आपटला.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून नवनवी शिखरं गाठत 36 हजाराच्या वर गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गडगडला आहे. ­केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर वाढवल्याची घोषणा केली सेन्सेक्स आपटला. हाच घसरणीचा सिलसिला आजही कायम असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 550 हून अधिक अंशांनी खाली आलाय, तर निफ्टीचीही 175 अंशांची पडझड झाली आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प बुधवारी संसदेत मांडला. त्यात टॅक्स स्लॅबमध्येही कुठलाही बदल न केल्यानं आणि एक टक्का सेस वाढवल्यानं नोकरदारांची, मध्यमवर्गीयांची साफ निराशा झाली. अर्थसंकल्प सुरू होण्याआधी बाजारात सकारात्मक वातावरण होतं. अर्थमंत्र्यांनी बजेट मांडायला सुरुवात करेपर्यंत बाजार जवळपास 170 अंशांनी वधारलेला होता. त्यानंतर, तासाभराने बाजार कोसळू लागला. ही घसरगुंडी बजेट संपेपर्यंत सुरू राहिली. अरुण जेटलींचं भाषण संपलं तेव्हा निर्देशांक 460 अंशांनी घसरला होता.  

इक्विटी ओरिएन्टेड म्युच्युअल फंडाने वाटप केलेल्या उत्पन्नावर 10 टक्के कर आकारणी केल्यामुळे गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे. आधीच घसरलेल्या व्याजदरामुळे अनेकांनी इक्विटी फंडात गुंतवणूक केली, त्यांना यामुळे नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय, शेअर्स व इक्विटी फंडाच्या युनिट विकून झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या रकमेवर देखील 10 टक्के कर आकारणी होणार असून त्यामध्ये फक्त 1 लाख रुपयापर्यंतचा नफा करमुक्त करण्यात आला आहे. या घोषणांवर शेअर बाजारातील गुंतवणूकदार आपली नाराजी व्यक्त करत आहेत. 

आज सकाळी बाजार उघडला, तेव्हापासून निर्देशांक खाली-खाली जाऊ लागला आणि एक वेळ अशी आली, जेव्हा तो 600 अंशांनी कोसळला होता. बँकिंग, ऑटोमोबाइल्स, धातू, फार्मा, रियल्टी, कॅपिटल गुड्स, तेल कंपन्यांना जबर फटका बसला. एफएमसीजी आणि आयटी कंपन्यांनी बाजाराला तारलं. पण, ही घसरगुंडी कधी थांबेल, हे आत्ता कुणीच सांगू शकत नाही. 

टॅग्स :अर्थसंकल्प २०१८निर्देशांकअरूण जेटली