नवी दिल्लीः 1 फेब्रुवारी 2020ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी मोदींच्या कार्यकाळात गतवर्षी 5 जुलै 2019लाही त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता. येत्या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. गेल्या वर्षी आर्थिक मंदीच्या अनेक बातम्या आल्या, अशातच सरकारसमोर बजेट कशा प्रकारे सादर करायचं हे आव्हान आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरू होणार असून, 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 2 मार्चला सुरू होणार असून, 3 एप्रिलपर्यंत राहील. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी दस्तावेजांच्या छपाईचं काम सुरू होतं. हे काम दरवर्षीप्रमाणेच हलवा सेरेमनीबरोबर सुरू होणार आहे.
काय आहे हलवा सेरेमनी आणि त्याची वैशिष्ट्यं?
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार करण्यात येतो. त्या हलव्याचं सगळ्यांमध्ये वाटप केलं जातं. त्यानंतर अर्थसंकल्पातील दस्तावेजांच्या छपाईच्या कामाला सुरुवात होते. दरवर्षी अर्थव्यवस्थेच्या दस्तावेजांची छपाई होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाच्या कार्यालयात एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो आणि अर्थसंकल्पाचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचं वाटप केलं जातं. केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम केला जातो. केंद्रीय मंत्रालयातील इतर अधिकारीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होतात.
Delhi: 'Halwa Ceremony' to be held at Ministry of Finance, North Block to mark the beginning of printing of documents relating to Union Budget 2020-21.
— ANI (@ANI) January 19, 2020
नवं काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड करण्याची परंपरा
भारतीय संस्कृतीनुसार काही नवं काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड करण्याची परंपरा आहे. त्यामुळे बजेटचे दस्तावेज छपाईसाठी पाठवण्यापूर्वी ही परंपरा पार पाडली जाते. तसेच भारतीय संस्कृतीत हलव्याला शुभ समजलं जातं. गोड खाण्यानं सकारात्मक विचार आणि ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे या हलवा सेरेमनीची सुरुवात केली जाते.
दोन भाषेत केली जाते दस्तावेजांची छपाई
खरं तर केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पादरम्यान जी दस्तावेज वाचून दाखवतात त्यांची छपाई दोन भाषेत (हिंदी आणि इंग्रजी) करण्यात येते. या छपाई प्रक्रियेच्या पूर्वी जो शिष्टाचार केला जातो त्याला हलवा सेरेमनी म्हटलं जातं. एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार करून मंत्रालयातील सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये त्याचं वाटप केलं जातं.
मंत्रालयाच्या बाहेरील कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही
हलवा सेरेमनीनंतर बजेटच्या छपाईशी संबंधित मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी नजरकैद ठेवलं जातं. ज्यात त्यांना कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क साधता येत नाही. देशाचं सामान्य बजेट तयार करण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख भूमिका असते. अर्थमंत्री आणि वित्त सचिवांसह सर्वच अधिकारी बजेटचा मायना तयार करण्यात आपलं योगदान देत असतात. हलवा सेनेमनीनंतर अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयातच राहावं लागतं. जोपर्यंत अर्थमंत्री बजेट सादर करत नाहीत, तोपर्यंत मंत्रालयातील कर्मचारी कुटुंबीयांच्या संपर्कात नसतात. विशेष म्हणजे त्यांना मोबाईल आणि ईमेल वापरण्यासही मज्जाव केला जातो.