नवी दिल्ली - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सुचकांक असलेला सेंसेक्स 650 अंकांनी घसरला. तर निफ्टीसुद्धा 250 हून अधिक अंकांनी घसरला. देशावर असलेले मंदीचे सावट आणि बाजारातील सुस्ती यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आज सकाळपासूनच शेअर बाजारामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत होते. आज बाजार सुरू झाल्यानंतर सेंसेक्समध्ये सुरुवातीलाच 600 अंकांनी घसरण झाली होती. त्यानंतर काही काळ सेंसेक्स सावरला होता. मात्र निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात उद्योग क्षेत्रासाठी फार मोठ्या घोषणा करण्यात न आल्याने वित्तमंत्र्यांचे भाषण आटोपल्यानंतर शेअर बाजारामध्ये प्रचंड निराशा पसरली. त्यामुळे विक्रीचा दबाव वाढल्याने सेंसेक्स 650 हून अधिक अंकांनी घसरला.
अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारात प्रचंड निराशा, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 2:06 PM