नवी दिल्लीः संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे नक्की काय, असा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, तर त्याचा अजिबात विचार करू नका. आम्ही खूप क्लिष्ट भाषेत तुम्हाला सांगणार नाही. त्यातल्या गमतीदार बाबी तुमच्यासमोर मांडणार आहोत. क्लिष्ट आणि किचकट आकडेवारी सोडून द्या, इतर असे काही विषय आहेत, जेणेकरून तुमचं मनोरंजन होईल अन् रंजक माहिती मिळेल. तर आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय?, तर सरकारनं मागच्या आर्थिक वर्षात काय कामगिरी केली हे सांगणारा अहवाल; तसंच येणारं आर्थिक वर्ष देशासाठी कसं असू शकेल; याचा अंदाज वर्तवणारा रिपोर्ट असतो. याला अर्थशास्त्रात खूप महत्त्व असतं, ते जाणून घेऊ यात काही रंजक बाबी पाहूया १) सार्वजनिक बँकांमधल्या कर्मचाऱ्यांना ई-सॉप म्हणजेच त्या त्या बँकेचे समभाग कर्मचाऱ्यांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यामुळे कर्मचारी हे त्या बँकेचे मालक होतील आणि त्यांच्यामध्ये जोखीम उचलण्याची भावना निर्माण होईल, असं अर्थतज्ज्ञांना वाटतं. गंमत म्हणजे हे बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर गेले आहेत. संपासाठी ते नेहमी वीकेंडच निवडतात. २) पुढच्याच शनिवारी दिल्लीमध्ये विधानसभेचं मतदान आहे. त्यामुळे दिल्लीचा उल्लेख हा असणारंच आहे. तुम्हाला जर दिल्लीत एखादं रेस्तराँ उघडायचं असेल तर खूप कष्ट पडतात. एखादा शस्त्र परवाना मिळवण्यासाठी जेवढी कागदपत्रं लागत नाहीत, तेवढी कागदपत्रं दिल्लीत हॉटेल उघडायला लागतात, असं हे सर्वेक्षण म्हणतं. ३) एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत भारतीय कंपन्यांनी भांडवली बाजारातून शेअर्स आणि रोख्यांच्या माध्यमातून तब्बल ७४ हजार कोटी रुपये उभे केले. मागच्या वर्षीच्या म्हणजेच २०१८ मधल्या याच काळातल्या तुलनेत ही वाढ तब्बल ६६ टक्क्यांनी जास्त आहे. ही चांगली बातमी यात आहे. Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल४) आता एक गमतीदार माहिती आहे. भारतीय नागरिकांना शाकाहारी थाळी आता जास्त परवडायला लागली आहे. २००६-०७ ते २०१८-१९ या १३ वर्षांच्या काळात शाकाहारी थाळी ही २८ टक्के जास्त परवडतेय, तर मांसाहारी थाळी ही १८ टक्क्यांनी परवडतेय. थोडक्यात काय तर तुमचं उत्पन्न इतकं वाढलंय की तुम्हाला २८ टक्क्यांनी शाकाहारी परवडतेय. ती स्वस्त झाली असं समजू नका. तुम्ही किती पैसे वाचवले हे पण यात सांगितलंय. जर एखाद्या कुटुंबात ५ सदस्य असतील आणि ते दिवसाला दोन शाकाहारी थाळ्या खात असतील तर त्यांनी वर्षाला १० हजार ८८७ रुपये वाचवले, असं हा सर्व्हे म्हणतो. ५) भारतानी १६९ देशांतल्या नागरिकांसाठी ई व्हिसा पद्धत लागू केली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांत दरवर्षी सरासरी २१ टक्क्यांनी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.६) एक चिंताजनक बाब आहे. ती म्हणजे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत खूप वाढ झाली असून, ही चिंतेची बाब आहे. उच्च शिक्षण हे आता सामान्यांना परवडेनासं झालंय, अशी कबुलीही या रिपोर्टच्या आधारे देण्यात आली आहे.
Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका