नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या रोजच्या जेवणाशी संबंधित काही आकडेवारी यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये प्रथमच देण्यात आली आहे. ‘थालीनॉमिक्स’ या शीर्षकाखाली असलेल्या या माहितीमध्ये थाळीचे अर्थशास्त्र (थाली इकॉनॉमिक्स) देण्यात आले आहे.
सर्वसामान्य कुटुंबाला एका वर्षाच्या जेवणाला किती खर्च येतो, याचा मांडलेला ताळेबंद म्हणजे थालीनॉमिक्स. केंद्रामध्ये भाजप सरकार अधिकारावर आल्यानंतर देशभरामध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवण स्वस्त झाल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. सन २०१५-१६ पासून किमतीत कपात करण्यात आल्याने शाकाहारी भोजन घेणाऱ्या कुटुंबाचे वर्षभरामध्ये १०,८८६ रुपये तर मांसाहारी भोजन घेणाºया कुटुंबाचे ११,७८७ रुपये वाचत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सन २००६-०७ या वर्षामध्ये असलेल्या किंमतींच्या तुलनेत सन २०१९-२० मध्ये शाकाहारी थाळी २९ टक्क्यांनी तर मांसाहारी थाळी १८ टक्क्यांनी स्वस्त झाल्याचा दावा सर्वेक्षणामध्ये करण्यात आला आहे.