Join us

budget 2021 : आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस तरतूद, कोरोनामुळे बदलले अर्थसंकल्पातील सारेच चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 3:31 AM

budget 2021: कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेच्या उघड्या पडलेल्या मर्यादा लक्षात घेत यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेच्या उघड्या पडलेल्या मर्यादा लक्षात घेत यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १३७ टक्क्यांनी ही तरतूद जास्त आहे. कोरोनावरील लसीकरणासाठी ३५ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद त्यात समाविष्ट आहे.कोरोनाकाळात देशातील आरोग्य यंत्रणांवर अतिताण पडून मर्यादाही उघड झाल्या होत्या. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय तज्ज्ञांची चणचण इत्यादी कारणे त्यास कारणीभूत होती. त्यातच आरोग्य क्षेत्रावर सर्वात कमी खर्च करणारा देश, अशीही भारताची ओळख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर अधिक भर दिला जाईल, अशी अटकळ खरी ठरली. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये १७ हजार ७८८ नागरी आणि ११ हजार २४ ग्रामीण आरोग्य केंद्रांची स्थापना केली जाणार असून एकात्मिक सार्वजनिक आरोग्य केंद्रांचीही उभारणी केली जाणार आहे. ११ राज्यांमधील ३३८२ गटांत आरोग्य केंद्रे उभारले जाणार आहेत. ६०२ जिल्ह्यांत क्रिटिकल केअर रुग्णालये उभारली जातील. १२ केंद्रीय संस्था, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांचे सक्षमीकरण इत्यादींची सुविधाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधनासाठी २६६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आयुष मंत्रालयाला २९७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.   

टॅग्स :बजेट 2021कोरोना वायरस बातम्याभारत