नवी दिल्ली : कोरोना साथीच्या सावटाखाली व शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी लस देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून अनेक समाजघटकांना काही प्रमाणात खूश करण्याचा प्रयत्न दिसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा वायदा करतानाच अर्थमंत्र्यांनी नवा कृषी सुविधा व विकास अधिभार पेट्रोल, डिझेलसह अनेक गोष्टींवर लागू केला आहे. मात्र या वस्तूंवरील आयात कर व सीमा शुल्क कमी केल्याने या वस्तूंच्या किंमती वाढणार नसून ग्राहकांना झळ बसणार नाही, असे सांगण्यात आले. तसेच अनेक सरकारी कंपन्या, एलआयसी व बँका यांची विक्री व निर्गुंतवणूक यांतून काही लाख कोटी उभारण्याचे सरकारने ठरिवले आहे.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट म्हणजे २ लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात फक्त ९४ हजार कोटी रुपयांची तरतूद होती. ती तिप्पट करून कोरोना साथीशी लढायला सज्ज असल्याचा संकेत केंद्र सरकारने दिला आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा...
आरोग्य क्षेत्र : घसघशीत २ लाख २३ हजार कोटी रुपयांची तरतूद
विमा क्षेत्र : ७४ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी
संरक्षण क्षेत्र : ४ लाख ७८ हजार कोटी रुपयांची तरतूद
कृषी क्षेत्र : पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार
पायाभूत सुविधा : १ लाख ०१ हजार कोटींची तरतूद
रेल्वे : १ लाख १० हजार कोटी रुपयांची तरतूद
निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून १ लाख ७५ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार
प्राप्तिकराच्या रचनेत बदल नाही. ७५ वर्षे वयापुढील ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकरातून सूट
२० वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी स्वैच्छिक स्क्रॅप पॉलिसी
महाराष्ट्राला काय मिळाले?
भुसावळ ते खरगपूर (पश्चिम बंगाल) मालवाहतूक कॉरिडॉर
६५ हजार कोटींचा ६०० किलोमीटरचा मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉर
नाशिक, नागपूर मेट्रोसाठी आठ हजार कोटींची तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी २०९२ कोटी रुपयांची तर नागपूर येथील मेट्रोसाठी ५९७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यानुसार देशात सात ठिकाणी मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले असून, त्यापैकी दोन महाराष्ट्रात येतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’
budget 2021: कोरोना साथीच्या सावटाखाली व शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी लस देण्याचा प्रयत्न केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 05:29 AM2021-02-02T05:29:26+5:302021-02-02T06:59:36+5:30