कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोरोनाच्या लॉकडाऊमध्ये नोकरी गेलेल्या लोकांसाठी पुन्हा रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यासाठी तरतूदींवर भर देण्याची गरज युवकांनी व्यक्त केली.
तरुणांसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल वाहनांविषयक अभ्यासक्रम मोफत द्यावे. जागोजागी ट्रेनिंग सेंटर उभारावेत. त्यातून रोजगार उपलब्ध होतील. तसेच स्टार्टअप उद्योग उभारणीसाठी छोट्या जागांची निर्मिती करावी. - दुर्गा भोर
अर्थसंकल्पात विशेषतः तरुणांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे आहे. बेरोजगारी वाढत चालली असल्याने नव्याने रोजगार निर्मितीबाबत धोरण ठरवावे. कोविडकाळात उद्योगधंद्यांना फटका बसल्याने शासनाने उद्योगधंद्याबाबतही सकारात्मक निर्णय घ्यावा.-किरण म्हात्रे
आत्मनिर्भर भारत ही योजना कोविडनंतर केंद्राने अस्तित्वात आणली आहे. अतिशय स्तुत्य असा हा केंद्राचा निर्णय आहे. याच धर्तीवर युवा वर्गाला रोजगारसंधी निर्माण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करावी. त्यामुळे नव्या संधीच्या शोघात असलेल्यांनाही दिलासा मिळेल. - केयुर गोगरी
कोविडनंतर परिस्थिती पूर्ववत होण्यास कालावधी जाणार आहे. आता नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याबाबत केंद्राने पॉलिसी तयार करावी. नव्याने रोजगाराच्या संधीचा गांभिर्याने विचार करून अर्थसंकल्पात या संधीला कसे पुढे नेता येईल, याचा विचार करावा. -अमोघ पवार
यावेळच्या अर्थसंकल्पाची उत्सुकता खूप आहे. कारण, परिस्थिती वेगळी आहे. नोकऱ्या गेलेल्या युवा वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. कोविडनंतर अचानक अनेक कंपन्यांनी कामगारांना कमावरून काढून टाकले. याबाबत धोरण ठरणे गरजेचे आहे.-अजय सिनारे