कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होईल. पण, कोरोनामुळे आपली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्यांने सोडवावेत, अशी अपेक्षा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्राचा खर्च वाढवावा. तसेच आरोग्य क्षेत्रात सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यात यावी. संसर्गजन्य आजारांचे प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभे राहायला हवे. तसेच प्रयोगशाळा, लस निर्माण करणाऱ्या कंपन्या यांना मदत मिळावी.- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय
केंद्र सरकारचा वेतन भत्ता लागू आहे तो भत्ता राज्यातही मिळावा. तसेच केंद्रात नर्सिंग ऑफिसर पदनाम आहे. पण आपल्याकडे पदनामात बदल केला जात नाही. आरोग्य व्यवस्थेवर ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे. - हेमलता गजबे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र परिचारिका संघटना, मुंबई विभाग
आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळाची कमरता आहे, ती दूर झाली पाहिजे. पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यात याव्यात. तसेच शिक्षण घेऊन नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना सरकारी नोकरीत आकृष्ट करण्यास उपाययोजना कराव्यात. - डॉ. अलका माने, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुसूत्रता असावी. या कर्मचाऱ्यांना योग्य आणि वेळेत वेतन मिळावे. काही राज्यात सहा महिने पगार मिळाले नाहीत त्याचा केंद्र सरकारने विचार करावा. ज्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे ती अद्ययावत करायला हवी.
- डॉ. संजय डोळस, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, माँ रुग्णालय