प्रसाद गो. जोशी
सप्ताहात संवेदनशील निर्देशांकाने गाठलेल्या ५० हजारांच्या टप्प्यानंतर बाजारामध्ये नफा कमविण्यासाठी विक्री वाढत आहे. यामुळे निर्देशांकाला ओहोटी लागलेली दिसून येत आहे. तोंडावर आलेला अर्थसंकल्प आणि जानेवारी महिन्याची होत असलेली सौदापूर्ती यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा बाळगलेला दिसत आहे. त्यामुळे आगामी सप्ताह हा बाजारासाठी अस्थिरतेचा राहण्याची शक्यता आहे.
गतसप्ताहाचा शुभारंभ बाजार वाढीने झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांकाने ५०,१८४.८७ असा उच्चांक गाठला. तसेच निफ्टीही १४,७०० अंशांचा टप्पा ओलांडून गेला. मात्र, त्यानंतर बाजारावर आलेले विक्रीचे दडपण यामुळे बाजार घसरला. पर्यायाने सप्ताहात निर्देशांकामध्ये घट झालेली दिसून आली.
परकीय वित्तसंस्थांची मोठी खरेदी सुरूच
परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारातील खरेदी कायम राखली आहे. जानेवारी महिन्यामध्ये या संस्थांनी सुमारे साडे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. १ ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये या वित्त संस्थांनी २४,४६९ कोटी रुपये समभागांमध्ये गुंतवणूक केली. मात्र, त्याच कालावधीमध्ये या संस्थांनी बॉण्डस्मधून ६०१३ कोटी रुपये काढून घेतले. याचाच अर्थ या संस्थांनी जानेवारी महिन्यामध्ये १८,४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कंपन्यांचे भांडवल वाढले
टॉप १० कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये गतसप्ताहामध्ये १,१५,७५८.५३ कोटी रुपयांची वाढ झाली. रिलायन्स, टीसीएस, हिंदु.युनिलिव्हर, बजाज फायनान्स या कंपन्यांचे भांडवलमूल्य वाढले.