केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात 'इन्कम टॅक्स स्लॅब'मध्ये काही बदल केला जातो का? याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष लागून होतं. पण सरकारनं नोकरदार वर्गाची निराशा केली आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल सरकारकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे करदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षातही आयकर भरावा लागणार आहे.
Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार
२०२०-२१ या वर्षात देशात एकूण ६.४ कोटी नागरिकांनी आयकर भरल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरुन वाढवून १० कोटी इतकी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय, ७५ वर्षांवरील नागरिकांना 'इन्कम टॅक्स'मधून आता सूट देण्यात आली आहे. ही सूट केवळ ७५ वर्षे झालेल्या पेन्शनधारकांसाठीच असणार आहे.
नेमका कुणाला किती कर भरावा लागणार?'इन्कम टॅक्स स्लॅब'मध्ये कोणताही बदल न केल्यानं गेल्यावर्षी प्रमाणेच कररचना राहणार आहे. यात २.५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपर्यंत आहे त्यांना आयकर भरावा लागणार नाही. तर २.५ लाख ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के आयकर भरावा लागणार आहे. पुढे ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १२.५ ते १५ लाखांच्या उत्पन्नावर २५ टक्के आणि १५ लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर भरावा लागणार आहे.