नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)मधील दरवर्षी २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक मिळणाऱ्या व्याजावर यापुढे कर लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून ही तरतूद लागू होणार आहे. या तरतुदीमागे मोठे वेतन मिळणाऱ्यांवर कर लावण्याचा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पामध्ये याबाबतची तरतूद केली आहे. ईपीएफने कर्मचाऱ्यांचे कल्याण साधले जाते. त्यामुळे ज्यांचे वेतन दरमहा २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना या तरतुदीमुळे फरक पडणार नाही, असे सीतारामन यांनी सांगितले. २.५ लाखांचा भरणा करणाऱ्यांची संख्या एकूण सभासदांच्या एक टक्क्यापेक्षा कमी असल्याचे व्यव सचिव टी.व्ही. सोमनाथन यांनी सांगितले. अधिक उत्पन्न असलेल्यांवर कराचा आपला प्रस्ताव आहे. त्यामुळे ईपीएफमध्ये वर्षाला २.५ लाखांपेक्षा अधिकच्या व्याजावर हा कर आकारला जाईल.