- हरिश गुप्तानवी दिल्ली : विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मतांसाठी अर्थकृपा केली आहे. या राज्यांसाठी अर्थसंकल्पात २.२७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पश्चिम बंगालमधील पायाभूत सुविधांसाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सीतारामन यांनी केरळला रस्ते आणि महामार्गांसाठी ६५ हजार कोटी, आसामला ३४ हजार कोटी आणि तामिळनाडूला १.०३ लाख कोटी रुपये अर्थसंकल्पात दिले. पश्चिम बंगाल आणि आसामला एक हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले गेले. हे पॅकेज या राज्यांत चहा मळ्यातील कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आहे. तामिळनाडूत ३,५०० किलोमीटर तर केरळात ११०० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम केले जाणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले. या राज्यांवर झाली कृपा तामिळनाडू : १.०३ लाख कोटी खर्चाचे ३,५०० किलोमीटरचे महामार्ग प्रस्तावित. मदुराई-कोल्लम व चित्तूर-थ्रिसूर मार्गांच्या कामाला पुढील वर्षी सुरुवात होईल.केरळ : ६५ हजार कोटींच्या १६०० किलोमीटरच्या मुंबई-कन्याकुमारी ‘कॉरिडॉर’ला मान्यता देण्यात येईल.पश्चिम बंगाल : २५ हजार कोटींच्या निधीतून ६७५ किलोमीटरचा महामार्ग बांधण्यात येईल. त्यात कोलकाता-सिलिगुडी मार्गाचाही समावेश असेल.आसाम : ३४ हजार कोटींची महामार्गाची कामे सुरू होतील व तीन वर्षांत १,३०० किलोमीटर मार्ग बांधण्यात येईल.
budget 2021 : मतार्थकृपा! निवडणुका असलेल्या चार राज्यांच्या पदरात घसघशीत माप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 5:18 AM