कोरोना प्रादुर्भावामुळे झालेल्या लाॅकडाऊनने सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी करणाऱ्या काही महिलांनाही घरी बसावे लागले आहे. या साऱ्यामुळे घरचे अर्थकारण सांभाळणाऱ्या महिलांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष तरतूद हवी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष अशी तरतूद करून महिला सक्षमीकरण व्हावे, बचत गटांना जास्तीत जास्त निधीची तरतूद करून त्यांना रोजगार उपलब्ध होईल व नोकरीतही महिलांना प्राधान्य देणारे धोरण सरकारने राबवायला हवे. - संपदा पाटील, गृहिणी, वाडा
अर्थसंकल्पामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना दिलासा मिळेल, अशा काही नवीन योजनांचा समावेश हवा. कोरोनामुळे विस्कटलेली घडी पुन्हा नव्या जोमाने रुळावर येईल, यासाठी सरकारने तरतूद करावी. - जिज्ञासा पाटील, विद्यार्थिनी, विज्ञान शाखा
मुलींच्या लग्नाचे वय वाढवतानाच, नोकरीतील वयोमर्यादाही वाढली पाहिजे. अन्यथा नोकरीअभावी चाळीशीनंतरच्या महिलांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. शिवाय विविध आजारांवर मोफत उपचार, समुपदेशन आणि जनजागृतीबाबत सखोल धोरणाची आवश्यकता आहे.- उज्ज्वला डामसे, समाजसेविका, डहाणू
येत्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारामध्ये आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करता येतील, अशी धोरणे जाहीर करावीत. महिला सक्षमीकरणासाठी तरतूद करण्यात यावी, असे मला वाटते. - जयश्री विनोद पाटील, गृहिणी, वाडा.
महिलाभिमुख अर्थसंकल्प तयार करण्याची गरज असून ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. महिलांचे आरोग्य, शिक्षण, रोजगार यासाठी विविध योजना राबविण्यात याव्यात. - वैदेही वाढाण, जिल्हा परिषद सदस्य, पालघर