Budget 2022: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या मनोरंजन क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोरोना महामारीच्या काळात चित्रपटगृह बंद होती त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती. पण अर्थसंकल्पात याबाबत काहीच ठोस तरदूत नसल्यानं मनोरंजन विश्वाची निराशा झाली आहे.
मनोरंजन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय मिळालं याबाबत बोलायचं झाल्यास सुपरहिट 'पुष्पा' सिनेमाचा डायलॉग अगदी चपखल बसतो. मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या मनोरंजन क्षेत्राला बजेटमधून 'फायर' नव्हे, तर 'फ्लावर' मिळालं आहे, असं म्हणता येईल.
"अर्थसंकल्पात नेहमीच मनोरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं जातं. क्विचितच मनोरंजन क्षेत्रासाठी काही घोषणा केल्या जातात. पण यावेळी कोरोनाचा फटका लक्षात घेता मनोरंजन क्षेत्रावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती. मनोरंजन क्षेत्रासारखे जे असंघटीत क्षेत्र आहेत त्यांच्यासाठी काही ना काही सुविधांची घोषणा अपेक्षित होती. पण त्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे. केंद्र असो किंवा राज्य सरकार असो कुणीच या क्षेत्राचा विचार करत नाही", असं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉईचे (FWICE) अध्यक्ष बीएन तिवारी यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राशी निगडीत अनेकांना रोजगार गमवावा लागला तर अनेकांचा मृत्यू देखील झाला. आजही अनेक कर्मचारी घरी बसले आहेत. सरकारचं बजेट दरवर्षी जाहीर होतं. पण ते नेमकं कुणासाठी असतं आणि त्याचा फायदा कुणाला होतो तेच कळत नाही. आम्ही देखील याच देशात राहतो आणि कर देखील भरतो. सरकारच्या मते मनोरंजन क्षेत्र म्हणजे फक्त मोठे स्टार हिरो आणि हिरोईन इतकाच आहे. ते सामान्य कर्मचाऱ्यांचा विचारच करत नाहीत. मनोरंजन क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे सरकारनं लक्षात घ्यायला हवं. कॅमेराच्या मागे काम करणारे लोक आज मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत आणि त्याच्या हक्काचा विचार सरकारनं करायला हवा होता, असंही बीएन तिवारी म्हणाले.
कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राशी निगडीत कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमासाठी तरी सरकार काहीतरी घोषणा करेल अशी अपेक्षा होती. पण त्यासाठी कोणतीच तरतूद किंवा निधी दिला गेलेला नाही. गेल्यावेळी जेव्हा कोरोनाशी लढा देण्यासाठी २० हजार कोटींचं बजेट जाहीर करण्यात आलं होतं. त्यातही मनोरंजन क्षेत्राचा समावेश नव्हता. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचाही बजेटमध्ये समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे, असं बीएन तिवारी यांनी सांगितलं.