- प्रसाद गो. जोशी
इंधनाच्या वाढत्या किमती, मजबूत होत असलेला डॉलर, अमेरिकेमध्ये व्याजदर वाढण्याची घोषणा आणि रशिया आणि युक्रेनदरम्यानचा तणाव या पार्श्वभूमीवर देशातील शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये मोठी घट झाली.
उद्या (१ फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे बाजाराच्या नजरा लागल्या असून त्यामध्ये काय जाहीर होते, ते पाहूनच बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे. अर्थसंकल्पाकडून बाजाराला फारशा अपेक्षा नाहीत मात्र त्यातील काही तरतुदी मारक ठरणाऱ्या असतील तर बाजारामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.
याशिवाय येत्या सप्ताहामध्ये देशाच्या औद्योगिक क्षेत्राचा पीएमआय जाहीर होणार आहे. हा पीएमआय थोडा कमी होण्याची शक्यता असून त्याचाही बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अर्थसंकल्पामध्ये दडलेल्या बाबी समोर आल्यावरच बाजाराचा मूड ठरणार हे निश्चित आहे.
सलग चौथ्या महिन्यात परकीय वित्तसंस्थांकडून विक्री
जानेवारी महिन्यामध्येही परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री करून बाजार खाली आणण्याला हातभार लावला आहे. सलग चौथ्या महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांची विक्री सुरूच असल्याचे दिसून आले आहे.
भारतीय शेअर बाजारामध्ये जानेवारी महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी २८,२४३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या संस्था भारतामध्ये विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जानेवारी महिन्यात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे.
बँकांचे समभाग वाढले
गतसप्ताहामध्ये बाजाराच्या सर्व प्रमुख निर्देशांकांची घसरण झाली असली तरी सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे समभाग मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचप्रमाणे काही निवडक कंपन्यांचे भावही वरच्या पातळीवर पोहोचले. त्याचा फायदा मिळून बाजाराच्या भांडवलमूल्यामध्ये १,४१,९.२.६९ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे, हे विशेष होय.