Budget 2022, Digital Currency: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या डिजिटल चलनाची चलती असताना भारत सरकार याबाबत नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते. याबाबत केंद्र सरकारनं आज मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) येत्या वर्षात देशाचं डिजिटल चलन आणलं जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
डिजिटल चलनाची अर्थव्यवस्था आता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भारताकडून डिजिटल रुपी (Digital Rupee) बाजारात आणला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. डिजिटल चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळेल असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करुन आरबीआयकडून यंदाच्या आर्थिक वर्षात 'डिजिटल रुपी' हे डिजिटल चलन आणलं जाईल, असं अर्थमंत्री म्हणाल्या. तसंच यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं अर्थसहाय्य होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा डिजिटल देश होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, डिजिटल चलनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याकडे कुठलीही योजना नव्हती. आता डिजिटल चलनाची घोषणा सरकारनं केल्यामुळे आभासी चलनाच्या विश्वात भारतही जोरदार एन्ट्री घेणार आहे.