नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी लोकसभेत अर्थसंकल्प केला. यावेळी 5G सेवेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पमध्ये 100 लॅब्स बांधण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर करताना, अर्थमंत्र्यांनी 100 प्रयोगशाळांच्या निर्मितीची घोषणा केली. या निर्णयामुळे टेलिकॉम जगताला मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीच भारतात 5G सेवेचे उद्घाटन केले होते. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल देशात 5G नेटवर्क सुविधा देत आहेत.
टेलिकॉम सेक्टर देशातील प्रमुख इंडस्ट्री आहे. देशात 5G नेटवर्क सुरू झाल्यानंतर लोकांना हाय स्पीडने इंटरनेटची सुविधा मिळू लागली आहे. दरम्यान, फक्त निवडक शहरांमध्ये 5G इंटरनेट कव्हरेज आहे, परंतु टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगाने 5G आणत आहेत. 5G लाँच करताना केंद्रीय कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टेलिकॉम इंडस्ट्रीत 5G साठी 100 लॅब्स स्थापन करण्याची विनंती केली होती. या 100 लॅब्सपैकी 12 लॅब्सचे इन्क्यूबेटरमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. त्याद्वारे टेलिकॉम सेक्टरची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येईल आणि प्रयोगांना चालना देता येईल.
5G लॅब्सद्वारे कसे होईल काम ?
5G लॅब्सचा वापर हाय-स्पीड इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल. याशिवाय, अशा अनेक गोष्टी आहेत जिथे या लॅब्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. या लॅब्स खाजगी क्षेत्राला स्वयंचलित चाचणी सुविधा पुरवतील. अकादमीशी संबंधित लोक आणि सरकार एकत्रितपणे भविष्याशी संबंधित संकल्पना प्रत्यक्षात आणू शकतील. मॅन्युफॅक्चरिंग आणि हेल्थकेअर यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये 5G चा वापर आणखी सुधारला जाऊ शकतो.
5G इंटरनेटचे फायदे
रिलायन्स जिओ आणि एअरटेल 5G सेवा देत आहेत. 5G च्या माध्यमातून युजर्स केवळ सुपरफास्ट स्पीडचाच फायदा घेऊ शकत नाहीत, तर ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी यासारख्या गोष्टींचाही फायदा घेऊ शकतात. या टेक्नॉलॉजीचा फायदा केवळ टेलिकॉम सेक्टरलाच नाही तर इतर सेक्टरना सुद्धा होणार आहे.