नवी दिल्ली: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण केले. द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणात त्यांनी विविध योजनांच्या आढावा घेतला. तर नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त केला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात नारीशक्तीचा सन्मान करण्याची संधी आहे. देशाच्या राष्ट्रपती आणि अर्थमंत्री दोन्ही महिला असल्याचा अभिमान आहे. अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीत भारताचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, जगाला दिसणारा आशेचा किरण अधिक उजळत आहे. यासाठी निर्मला सीतारामन या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा माझा ठाम विश्वास आहे, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
अर्थसंकल्पाबाबत द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, २०४७ पर्यंत आपल्याला भूतकाळातील वैभवाशी जोडलेले आणि आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असलेले राष्ट्र निर्माण करायचे आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो 'आत्मनिर्भर' असेल आणि आपली मानवी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल, असे मुर्मू म्हणाल्या. सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडून दिले आहे, याबद्दल देशवासियांचे मी आभार मानत आहे. माझ्या सरकारने नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले, धोरण-रणनीती पूर्णपणे बदलण्याची इच्छाशक्ती दाखवली.अमृतकाळाचा हा २५ वर्षांचा कालखंड म्हणजे स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे. या काळात प्रत्येक भारतीयाला कर्तव्याचा कळस गाठायचा आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, भारताच्या अर्थसंकल्पावर सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. असं नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेलाही मोठ्या आशा आहेत. वंदे भारत २.०, ३५ हायड्रोजन ट्रेनची भेट मिळू शकते. या अर्थसंकल्पात ४०० ते ५०० वंदे भारत गाड्या, ४००० नवीन ऑटो मोबाईल वाहक डबे, ५८००० वॅगन गाड्यांची भेट मिळू शकते. अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.९ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री तिकीट दरात सवलत देतील, अशी ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे.