नवी दिल्ली : येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मंगळवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला. चालू वित्तीय वर्षाच्या तुलनेत हा दर कमी असला तरी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा लौकिक कायम राखणारा आहे, असेही यात नमूद केले आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३’ संसदेत सादर केले. यात म्हटले आहे की, २०२२-२३ मध्ये भारताच्या जीडीपीचा वृद्धिदर ७ टक्के अनुमानित केला आहे. आदल्या वर्षी तो ८.७ टक्के होता. या दोन्ही वर्षांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये वृद्धिदर कमी म्हणजेच ६.५ टक्के राहील.
राेजगारांचा विचार करता स्थिती काेराेनापूर्व काळापेक्षाही चांगली आहे, असे म्हटले आहे. सप्टेंबर २०१९च्या तिमाहीत बेराेजगाराचा दर ८.३ टक्के हाेता. ताे २०२२ मध्ये याच कालावधीत ७.२ टक्के हाेता. ईपीएफओची आकडेवारीदेखील हेच सुचवित आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये सदस्याच्या संख्येत ५८.७ टक्के वाढ झाली. एप्रिल-नाेव्हेंबर २०२२ या काळात सरासरी १३.२ लाख सदस्य दरमहा वाढले.
कृषी क्षेत्राची कामगिरी चांगली, नवी दिशा हवी
कृषी क्षेत्राने यंदा चांगली कामगिरी केली. हवामान बदलाचा प्रतिकूल प्रभाव आणि शेतीचा वाढता खर्च या पार्श्वभूमीवरनवी दिशा देण्याची गरज आहे. मागील ६ वर्षांत कृषी क्षेत्राचा सरासरी वृद्धीदर ४.६ टक्के राहिला. २०२१-२२ मध्ये निर्यात उच्चांकी ५०.२ अब्ज डॉलरइतकी राहिली.
कोरोनाच्या २ वर्षांनंतर घरांच्या किमतींत वाढ
कोविड-१९ साथीच्या २ वर्षांच्या काळात घरांच्या किमतींत मंदी होती. या किमती आता वाढू लागल्या आहेत. मागणी वाढल्यामुळे पडून असलेल्या घरांची संख्या कमी झाली आहे. गृहकर्जांचा व्याज दर वाढलेला असतानाही घरांची विक्री वाढली आहे.
दरवर्षी एक काेटी ई-वाहनांची हाेणार विक्री
देशात २०३० पर्यंत ई-वाहनांची बाजारपेठ माेठी झेप घेणार असून दरवर्षी १ काेटी ई-वाहनांची विक्री हाेणार असल्याचा अंदाज आहे. यात ५ काेटींहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेण्याची अपेक्षा आहे. हे क्षेत्र दरवर्षी ४९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
बाजाराची कामगिरी
देशात शेअर बाजाराची वाढ वेगाने होत आहे. ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीमुळे बाजार ३.९% इतक्या दराने वाढत आहे. या बाबतीत भारत इतर अनेक देशांना मात देईल असे दिसत आहे.
अर्थव्यवस्था 6 ते 6.8 टक्क्यांनी वाढणार
राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यंदा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला. यात चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाची अर्थव्यवस्था ६ ते ६.८%नी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.