- विवेक गोगटे
(माजी अध्यक्ष, निमा)
ज्या प्रमाणे आकाशातील सप्तर्षी मार्ग दाखवतात त्याचप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्प सप्तर्षी सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे, सोयी सुविधांचा विकास, सामर्थ्याचा उपयोग करून घेणे, हरित विकास, तरुणाईची शक्ती व आर्थिक व्यवस्थापनावर आधारलेला आहे त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. जागतिक राजकीय अस्थैर्य, वाढती महागाई, घटता विकास दर, वाढते व्याजदर या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्था इतरांच्या तुलनेत भक्कम पायावर उभी आहे. याला आर्थिक सर्वेक्षण अहवाल पुष्टी देतो.
अर्थसंकल्पावरील एक प्रतिक्रिया बोलकी आहे. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे भारत विषयक प्रतिनिधी डॉ. सुब्रमण्यम यांनी अर्थसंकल्पाचे सर्वोत्तम म्हणून केलेले स्वागत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १० लाख कोटी रुपये म्हणजे ३३% वाढ केलेली आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊन रोजगार निर्मितीसाठी मदत होईल. अन्य तरतुदी देखील स्वागतार्ह आहेत. सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरीच्या आयात शुल्कात करण्यात आलेली कपात, स्टार्टअप कंपन्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या कालावधीत वाढ स्वागतार्ह आहे. लघुउद्योगांसाठी ९००० कोटी निधी, व्याजदरात १% सूट पुरेशी नाही. संशोधन केंद्रांची निर्मिती केल्याने आरोग्य क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
आयकरात सवलती दिल्याने मध्यमवर्ग आनंदी होऊन त्यांच्या हातात दोन पैसे अधिक उपलब्ध होतील. ग्रामीण भाग आणि शेतकरी यांच्यासाठी आखलेल्या योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांची क्रयशक्ती वाढेल. यातून शक्य तितक्या लवकर आपण आपले ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठू शकू, असा विश्वास आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या लिथियम बॅटरीसाठी आयात शुल्कात कपातीची अपेक्षा होती, ती पण पूर्ण होताना दिसत आहे. लघुउदयोगांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर मिळावेत म्हणून तरतूद आहे पण त्या पुरेशा नाही.