- संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला खूश करु शकतात. अलिकडे त्यांनी मध्यमवर्गीयांमध्ये जाऊन सरकारच्या योजना व त्यांचे फायदे समजून सांगण्याचे निर्देश सर्व मंत्र्यांना दिले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गाला खूश करण्यासाठी अनेक प्रलोभने देऊ शकतात. यात मध्यमवर्गाची जुनी मागणी म्हणजे आयकर सूट मर्यादा वाढवून ५ लाख करण्याची मागणी मोदी सरकार पूर्ण करू शकते. होम लोनवर दिलासा देण्यासह अनेक उपाययोजना बजेटमध्ये पाहण्यास मिळू शकतात.
आगामी काळात आणखी घोषणा शक्य
यावेळी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मध्यमवर्गाची चिंता करण्यास सांगितले आहे. याचा परिणाम अर्थसंकल्पातही दिसू शकतो. आगामी काही दिवसांत मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी आणखी काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. २०२४ अजून दूर असले तरी मध्यमवर्गाला तोपर्यंत खूश करायचे आहे.