नवी दिल्ली : अर्थसंकल्पासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील अर्थसंकल्पात रेल्वेने 35 हायड्रोजन-इंधन असलेल्या ट्रेन, 400-500 वंदे भारत ट्रेन, नवीन डिझाइन जवळपास 4,000 ऑटोमोबाईल कॅरिअर कोच आणि जवळपास 58,000 वॅगन्सचा समावेश करण्याची घोषणा केली जाऊ शकते. हे सर्व पुढील तीन वर्षांत रुळावर आणले जाऊ शकते.
अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेला 1.9 लाख कोटी रुपये निधी म्हणून दिले जाऊ शकतो, असे या रिपोर्टमध्ये सूत्रांचे म्हणणे आहे. याद्वारे, भारत सरकारला रेल्वेमध्ये आपले रोलिंग स्टॉकचे आधुनिकीकरण (रेल्वे, डबे आणि वॅगन्स), रेल्वे ट्रॅकचे सुधारणे आणि विद्युतीकरण (electrification) आणि 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन (net zero carbon emission) करण्याचे लक्ष्य साध्य करायचे आहे.
सुत्रांनी सांगितले की, अर्थसंकल्पात रोलिंग स्टॉक प्रोग्रॉमसाठी जी घोषणा होईल, ती येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. यासाठी सुमारे 2.7 लाख कोटी रुपये दिले जातील, जे आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातील सर्वाधिक असेल. सूत्रांनी असेही सांगितले की, अर्थसंकल्पात न्यू ऐज रोलिंग स्टॉक व्यतिरिक्त, 100 व्हिस्टाडोम कोच बनविण्याची योजना आणि प्रीमियर ट्रेनच्या 1,000 डब्यांचे नूतनीकरण (refurbishment) देखील प्रोग्रॉममध्ये समाविष्ट केले जाईल.
500 वंदे भारत ट्रेनवर सुमारे 65 हजार कोटींचा खर्च500 वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी जवळपास 65 हजार कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रेल्वे सुमारे एक हजार डब्यांमध्ये वॉटर-मिस्टवर आधारित अग्निशामक यंत्रणा बसवण्याचा विचार करत आहे.
हेरिटेज मार्गांवर धावणार हायड्रोजन ट्रेन अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, रेल्वे आठ हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेन सुरू करणार आहे. या मार्गांमध्ये कालका-शिमला, कांगडा व्हॅली, दार्जिलिंग आणि निलगिरी मार्गांचा समावेश आहे. खरंतर हे मार्ग पूर्णपणे 'ग्रीन' म्हणजेच हरित करण्याच्या उद्देशाने रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वे उत्तर रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये हायड्रोजन इंधन ट्रेनचा प्रोटोटाइप बनवत आहे. त्याची चाचणी सोनीपत-जिंद विभागावर केली जाईल.