- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी लोकसभेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाला पूर्णपणे नवीन आयाम दिला असून, ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक स्थितीत केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या अर्थसंकल्पाकडे आहे.
हा अर्थसंकल्प भारतातील सर्वसामान्य माणसाच्या केवळ आशाआकांक्षा आणि स्वप्नेच पूर्ण करणारा नसेल, तर जगही त्याकडे आशेने पाहत आहे, असे सांगून मोदींनी उत्सुकता वाढवली आहे.
अर्थसंकल्प केवळ भारतासाठी नव्हे, तर जगासाठी आहे, असे मोदींनी यापूर्वी कधीही म्हटलेले नव्हते. त्यामुळे हा अर्थसंकल्प गुंतवणूकदारस्नेही असण्याचा स्पष्ट संदेश जगभरातील गुंतवणूकदारांना मिळतो. तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी मांडलेल्या अडचणीही यातून दूर होतील, असे संकेत मिळत आहेत. २०१४ पासून मोदींच्या कार्यकाळातील हा नववा अर्थसंकल्प आहे. परंतु, यापूर्वी मोदींनी कधीही जागतिक गुंतवणूकदारांना थेट अशा पद्धतीने आकर्षित केले नव्हते.
चीन नव्हे, फक्त भारत
हा अर्थसंकल्प लोकाभिमुख उपायांनी परिपूर्ण नसला तरी समाजातील मध्यमवर्ग, महिला व रोजगाराभिमुख पिढीला दिलासा देणारा असेल. आरोग्य आणि गृहनिर्माण क्षेत्राला यातून काहीशी उभारी मिळू शकेल. परंतु, मोदींचे लक्ष्य जागतिक गुंतवणूकदारांना चीन नव्हे तर फक्त भारत अनुकूल आहे, हे दाखवून आकर्षित करण्याचे आहे.