नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरू झाले असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात कोरोनाकाळात मोफत अन्न-धान्य पुरवठा योजनेसह कोणी उपाशीपोटी झोपणार नाही, याची आम्ही काळजी घेतली, असे म्हटले आहे.
जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. त्यामुळे जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने २ लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. पीएम अन्नपूर्ण कौशल्य योजनेची सुरुवात होणार आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गोरगरिबांसाठी मोफत धान्य पुरवठ्यात एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत रेशनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
याचबरोबर, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. जो जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या. तसेच, लोकसहभागातून सरकार सबका साथ, सबका विकास या माध्यमातून पुढे गेले आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. शेतकरी, महिला आणि अनुसूचित जातीचा विकास केला जात आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासावर भर दिला जात असून भारत जगातील सर्वात मोठा अन्न उत्पादक आणि निर्यातदार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.