आत्मनिर्भर भारतासाठी मोदी सरकार उद्या मोठे पाऊल उचलणार आहे. देशातच वस्तू बनाव्यात किंवा देशातील वस्तूंची मागणी वाढावी यासाठी परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर कस्टम ड्यूटी वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे. उद्या मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या या पावलामुळे मेक इन इंडियाला बळ मिळणार आहे. यासाठी ३५ प्रकारच्या वस्तूंवर आयात कर वाढविला जाणार आहे. यामध्ये प्रायवेट जेट, हेलिकॉप्टर, हाय एंड इलेक्ट्रॉनिक आयटम्स, प्लास्टिकचे सामान, ज्वेलरी, हाय ग्लॉस पेपर आणि व्हिटामिन सारख्या वस्तू असणार आहेत.
ज्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढवण्याची सरकारची योजना आहे त्यांची यादी वेगवेगळ्या मंत्रालयांकडून प्राप्त झाली आहे. यापैकी ३५ वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात या वस्तूंच्या निर्मितीला चालना देण्यासाठी आयात महागडी केली जात आहे. डिसेंबरमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना अत्यावश्यक नसलेल्या आयात वस्तूंची यादी तयार करण्यास सांगितले होते ज्यावर कस्टम ड्युटी वाढवता येऊ शकते.
चालू खात्यातील तुटीमुळे आयात कमी करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. खरेतर, चालू खात्यातील तूट जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 4.4 टक्क्यांच्या नऊ महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली होती. ही तूट वाढण्याची शक्यता डेलॉईटने व्यक्त केली होती. याचबरोबर महागाईमुळे निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा कुठेतरी मेळ जोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.