Join us  

Budget 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 2:46 PM

Union Budget 2024: आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची माहिती दिली. 

PM Surya Ghar Yojana : नवी दिल्ली :  विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' (PM Surya Ghar Yojana) हाती घेतली आहे. दरम्यान, आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची माहिती दिली. 

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत १.२८ कोटी नोंदणी आणि १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सभागृहात दिली. यानंतर दुपारी १२ च्या सुमारास सोलर स्टॉकमध्ये ११ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. 

(यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...)

जाणून घेऊया काय आहे ही योजना?१५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. देशातील जवळपास १ कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत सौर पॅनेल खरेदी करण्यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाईल.

सर्वात मोठी सूट कोणाला मिळेल?एक किलोवॅटपर्यंत सौर पॅनेल बसवणाऱ्याला १८ हजार रुपयांची सबसिडी दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच, दोन किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनलवर ३० हजार रुपयांची सूट दिली जाईल, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल बसवणाऱ्या व्यक्तीला ७८ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. म्हणजेच या सूर्य घर योजनेत तुम्हाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते.

कशी मिळेल सबसिडी? - सर्वात आधी तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल, त्यासाठी तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा. यानंतर तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकावा लागेल. - दुसऱ्या टप्प्यात, ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगइन करा आणि फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.- तिसऱ्या टप्प्यात, जेव्हा तुम्हाला Feasibility Approval मंजूरी मिळेल, तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.- इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा. - पुढील टप्प्यात, नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे पडताळणी केल्यानंतर, पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. - शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द - केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल.

कुठे कराल नोंदणी?तुम्हालाही केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. याशिवाय, जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करू शकता. 

टॅग्स :अर्थसंकल्प 2024लोकसभानरेंद्र मोदीनिर्मला सीतारामनवीज