Join us

अर्थसंकल्प तीन दिवसांवर, गुंतवणूकदार सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 5:51 AM

Stock Market: आगामी  वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प अवघ्या तीन दिवसांवर आहे. त्याचबरोबर अमेरिकेमधील व्याजदराबाबतचा निर्णयही या महिन्याच्या अखेरीस होत असल्याने बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

- प्रसाद गो. जोशीआगामी  वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प अवघ्या तीन दिवसांवर आहे. त्याचबरोबर अमेरिकेमधील व्याजदराबाबतचा निर्णयही या महिन्याच्या अखेरीस होत असल्याने बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यातच एफ ॲण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती असल्यामुळे या सप्ताहाचा पूर्वार्ध तरी मंदीमध्ये राहण्याचीच शक्यता दिसते. अर्थसंकल्पांमधील काही तरतुदींमुळे बाजारात नंतरही कदाचित मंदीची शक्यता राहण्याची शक्यता जाणवते.  

मुंबई शेअर बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आल्यामुळे सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ७२२.९८ अंशांची बुडी मारली आहे. हा निर्देशांक ७०,७००.६७ अंशांवर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा अधिक व्यापक पायावर असलेल्या निर्देशांकामध्ये (निफ्टी) घसरण झालेली दिसून आली. हा निर्देशांक २१९.२० अंशांनी खाली येऊन २१,३५२.६० अंशांवर बंद झाला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरणच झाली. 

नफा कमविण्यासाठी परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा धडाका लावला. मात्र, त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी बऱ्यापैकी खरेदी करून बाजार खाली येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. 

आगामी सप्ताहात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक असून त्यात  व्याजदराबाबत निर्णय होणार आहे. व्याजदर कमी होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे व्याजदर कमी झाल्यास तेथे होणारी गुंतवणूक भारतात वळविली जाऊ शकते.

सवलती की जादा कर?- भारतामध्ये या वर्षामध्ये निवडणुका असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यामधून बऱ्यापैकी सवलतींचीच अपेक्षा असली तरी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ होण्याची बाजाराला भीती आहे. - त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये एफ ॲण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती असल्यामुळे बाजार खालीच राहण्याची शक्यता दिसते.

जानेवारीमध्ये काढले २४,७०० कोटी रुपयेअमेरिकेमध्येे १० वर्षांच्या बॉण्ड्सवरील मिळकत वाढल्याने परकीय वित्तसंस्थांनी भारतामधील गुंतवणूक अमेरिकेच्या बॉण्ड्सकडे वळविलेली दिसते. मात्र, त्यामुळे भारतीय शेअर बाजारातून या संस्थांनी चालू महिन्यात २४,७०० कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांकडून १२,१९४.३८ कोटी रुपयांचे समभाग विकले गेले तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ९७०१.९६ कोटींचे समभाग विकत घेतले आहेत.सप्ताहाच्या अखेरीस बाजाराच्या निर्देशांकांमध्ये घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे तीन लाख २८ हजार ४३६.९५ कोटी रुपये बुडाले आहेत. बाजारातील एकूण समभागांचे मूल्य ३,७१,१२,१२३.०८ कोटी रुपयांवर आले आहे.

टॅग्स :शेअर बाजारअर्थसंकल्प 2024