Join us

Budget 2024 : "1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, स्वावलंबी झाल्या; आता 3 कोटींचं लक्ष्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 12:38 PM

Budget 2024 And Nirmala Sitharaman : गेल्या दहा वर्षांत अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे. देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीने काम सुरू असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या दहा वर्षांत अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे. देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीने काम सुरू असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, आता 3 कोटींचं लक्ष्य असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

"लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे, लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आलं आहे" अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. 

"सर्वांसाठी घर, सर्वांसाठी पाणी, सर्वांसाठी वीज, ८० कोटी लोकांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढवण्यात आली आहे. सर्व गरजूंना सरकारी योजनांचा लाभ देण्यावर जोर देण्यात आला. जनतेच्या हितासाठी काम करण्यास सुरु केलं आहे. जनतेला अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनतेनं आम्हाला दुसऱ्यांदा संधी दिली. आम्ही व्यापक विकासाचं ध्येय ठेवलं."

"4 कोटी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. गरीब, महिला, तरुण, अन्नदात्यांवर फोकस. स्वनिधी योजनेद्वारे 2.3 लाख स्ट्रीट वेंडर्सना कर्ज देण्यात आलं. 30 कोटींचं मुद्रा लोन महिला उद्योजकांना देण्यात आलं. 11.8 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला. पीएम मुद्रा अंतर्गत 22.5 लाख कोटींचं कर्ज देण्यात आलं.  वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग वाढला. 10 वर्षांमध्ये उच्च शिक्षणात महिलांची भागीदारी 28 टक्क्यांनी वाढली."

"10 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. 2014 मध्ये देश अनेक आव्हानांचा सामना करत होता. सरकारने त्या आव्हानांचा सामना केला आणि त्यात सुधारणा केल्या. जनतेसाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. आमचं सरकार सामान्य लोकांच्या जीवनात बदल आणण्याची गॅरंटी घेत आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्राच्या विकासाच्या संकल्पासह काम करत आहोत. एक कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म मिशनवर काम सुरू आहे. एमएसएमईसाठी व्यवहार सोपं करण्यावर काम सुरु आहे. पुढील 5 वर्षात गरीबांसाठी 5 कोटी घरं उभारली जातील" असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनकेंद्रीय अर्थसंकल्प 2019