नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला सलग सहावा अर्थसंकल्प सादर केला. त्यांचे हे अर्थसंकल्पीय भाषण आतापर्यंतचे सर्वांत छोटे भाषण होते. त्या फक्त ५६ मिनिटे बोलल्या. त्यातही सीतारामन यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी बाकांवरून सातत्याने घोषणा देण्यात येत होत्या. जुलैमध्ये ‘आमचेच सरकार’ पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असे त्या म्हणाल्या, तेव्हा तर खूप टाळ्या पडल्या.
विरोधी बाकांवरील सदस्यांनी अर्थमंत्र्यांचे पूर्ण भाषण अगदी मन लावून ऐकले. लोकसभा निवडणुकीनंतर आमचेच सरकार येणार, असे जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी जाेरदार स्वागत केले. तर, विरोधकांकडून नाराजीचे स्वर उमटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा कक्षात आगमन होताच सत्ताधाऱ्यांनी ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘जय सीयाराम’ अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान सभागृहात आसनस्थ होईपर्यंत या घोषणा सुरू होत्या. सीतारामन यांच्या यंदाच्या भाषणात आधीच्या भाषणांप्रमाणे तमिळ कवींच्या ओळींचा किंवा विचारवंतांच्या सुभाषितांचा उल्लेख नव्हता. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा आणि त्यांच्या भाषणांचा किमान आठ वेळा उल्लेख केला.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पंकज चौधरी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घ्यायला गेले तेव्हा मुर्मू यांनी सीतारामन यांना चमच्याने गाेड दही भरवून शुभेच्छा दिल्या.
जुने शब्द, नवी व्याख्या
सीतारामण यांनी काही जुन्या शब्दांची नवी व्याख्या केली. ‘एफडीआय’ला त्यांनी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’, ‘जीडीपी’ला ‘गव्हर्नंस, डेव्हलपमेंट ॲंड परफाॅर्मंस’ असा उल्लेख केला.
सलग सहाव्यांदा मांडले बजेट
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्वत:चाच सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम यंदाही मोडता आला नाही. यावेळी त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यासाठी अवघी ५६ मिनिटे घेतली.
कोणता शब्द किती वेळा?
टॅक्स ४२
पीएम ४२
पॉलिसी ३५
सरकार २६
भारत २४
महिला १९
स्कीम १६
किसान १५
फायनान्स १५
ग्लोबल १५